बीडच्या शेतकऱ्याने पिकवला तब्बल पाच किलोचा मुळा! नेमका काय आहे प्रकार ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ मार्च । बीड जिल्ह्यातील बहुतांश लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. पण येथील शेतकऱ्यांना नेहमीच दुष्काळाशी सामना करावा लागतो. तरीही आधुनिक पद्धतीची शेती करत काही शेतकऱ्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेतीत वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा आपण वाचल्या किंवा पाहिल्या असतील. बीडमधीलशिरुर तालुक्यातील शेतकऱ्याने तर कमालच केली आहे. कोळेवाडीचे शेतकरी ज्ञानदेव शेषराव नेटके यांनी तब्बल पाच किलोचा मुळा पिकवला आहे. आता त्यांच्या या मुळ्याच्या शेती पंचक्रोशित चर्चा आहे.

कोळेवाडीतील ज्ञानदेव नेटके हे पारंपरिक शेती करतात. त्यांनी अडीच एकर भूईमुगाची शेती केली. भूईमुगाच्या पिकात मुळ्याची लागवड केली. जवळपास अर्धा गुंठ्यातील मुळा मोठा झाल्यानंतर काढला. तर एक मुळा तब्बल पाच किलोचा भरला. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

अर्ध्या गुंठ्यात पाच किलोचे 15 मुळे
मुळ्याचे वजन पाव किलो ते जास्तीत जास्त एक किलोपर्यंत असू शकते. परंतु, तब्बल पाच किलोचा मुळा आढळल्याने नेटके यांनी इतर मुळेही काढून घेतले. तर त्यात तब्बल 15 मुळे 5 किलोपेक्षा जास्त वजनाचे आढळले. तर इतर मुळ्यांचेही वजन जास्तच होते.

पंचक्रोशित चर्चा, कृषी अभ्यासक भेटीला
नेटके यांच्या शेतात पाच किलोचे मुळे आढळल्यानंतर त्याची पंचक्रोशित चर्चा आहे. अनेक शेतकरी याठिकाणी येऊन मुळ्याची शेती बघून गेले आहेत. तर कृषी अभ्यासक, संशोधकांनीही नेटके यांच्या शेतीला भेट दिली. एवढ्या मोठ्या मुळ्याबाबत कुतूहल असल्याने परिसरातील नागरिकही मुळा पाहण्यासाठी येत आहेत.

मुळ्याचे वजन पाच किलो का भरले?
कोळेवाडी येथील शेतकरी ज्ञानदेव नेटके यांच्या शेतातील मुळ्याचे वजन एवढे कसे वाढले आहा कुतुहलाचा विषय आहे. त्यांनी मुळ्याची लागवड केल्यानंतर सेंद्रीय खतांचा वापर केला. शेणखता बरोबरच 10-26-26 व सुपरफॉस्फेट हे खत दिले. त्याबरोबरच वेळच्या वेळी पाणीही दिले. त्यामुळेच या मुळ्याचे वजन पाच किलो भरले असल्याचे शेतकरी नेटके यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *