Lawrence Bishnoi: त्याने जेलमधून मुलाखत दिली? पोलिसांनीच आता स्पष्टपणे सांगितलं…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ मार्च । कुख्यात गुंड आणि सिद्धू मुसेवाला प्रकरणातला मुख्य आरोपी लॉरेन्स बिश्नोई याने काल एका माध्यम समूहाला मुलाखत दिली. तो जेलमध्ये असूनही दिलेल्या या मुलाखतीची सध्या जोरदार चर्चा आहे. या मुलाखतीमुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मात्र त्यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे.

भटिंडा कारागृहाचे निरीक्षक एन डी नेगी यांनी माध्यमांशी संवाद साधत पोलिसांची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, “लॉरेन्स बिश्नोई सध्या इथेच भटिंडा जेलमध्ये आहे. त्याने दिलेली मुलाखत पंजाबमधल्या कुठल्याच जेलमधला नाही. एजन्सी रिमांडमध्ये घेऊन जातात, तिथून कुठूनतरी तो बोलत असेल. पण पंजाबच्या कोणत्याही जेलमधला हा व्हिडीओ नाही. हा जुना आहे, लेटेस्ट नाही. कारण सध्या तो भटिंडा जेलमध्ये आहे.

जेलच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल बोलताना ते म्हणाले, “भटिंडा जेलमध्ये जॅमर्स आहेत. सुरक्षा व्यवस्था कडक आहे. आम्ही त्याच्यावर २४ तास नजर ठेवून आहोत. इथे फोनही चालत नाही, त्यामुळे पंजाबच्या कोणत्याही जेलमधून कोणालाही अशी मुलाखत देणं शक्य नाही.”

कालच एबीपी न्यूजने आपल्या वाहिनीवरुन लॉरेन्स बिश्नोई याची मुलाखत दाखवली. या मुलाखतीवरुन आता चर्चांना उधाण आलं आहे. पोलीस बंदोबस्तात असतानाही बिश्नोई अशी मुलाखत कशी देऊ शकतो, त्याला कारागृहात मोबाईल पुरवण्यात आला आहे का? अशा अनेक चर्चा सध्या सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *