“सारं स्पष्ट आहे…बाहेर थट्टा होतेय, लोकांचा आपल्यावर विश्वास उरला नाही”, कोर्टात सिब्बल स्पष्टच बोलले!

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ मार्च । राज्यातील सत्ता संघर्षाच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांना आज याचिकेच्या रिजॉइंडरसाठी वेळ देण्यात आला आहे. यात कपिल सिब्बल ठाकरे गटाची बाजू आणखी भक्कम करण्यासाठी जोरदार युक्तिवाद करत आहेत. यात सिब्बल यांनी कोर्टासमोर आपली रोखठोक भूमिका मांडताना कोर्टरुमबाहेर जनमानसात काय प्रतिमा निर्माण झालीय याचाही आधार घेत युक्तिवाद केला.

“मला आता अधिक काही सांगण्याची गरज नाही. माझा राजकीय अनुभव आणि तुमचा न्यायिक अनुभव हे प्रकरण समजून घेण्यासाठी पुरेसा आहे. आपलं महत्व कमी झालंय. आता आपली बाहेर थट्टा होते. लोकांचा आता आपल्यावर विश्वास उरलेला नाही”, असं रोखठोक मत कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीशांसमोर व्यक्त केलं आहे. राज्यपाल असो किंवा मग हे न्यायालय…विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारात कुणीच हस्तक्षेप करू शकत नाही. अध्यक्षांचे अधिकार अबाधित राहिलेच पाहिजेत, असंही ते पुढे म्हणाले.

कपिल सिब्बल यांनी आजच्या युक्तिवादात राज्यपालांच्या भूमिकेवरच जोरदार आक्षेप नोंदवला. बहुमत चाचणी केवळ युतीच्या जोरावर बोलावली गेली पाहिजे होती. पण इथं राज्यपालांनी पक्षातील मतभेदाच्या आधारावर बहुमत चाचणी बोलावली. त्यांनीच पक्षाचा नेता कोण हे ठरवून टाकलं, हे म्हणजे असं झालं की निवडणूक आयोगाकडे ज्या राजकीय पक्षाची नोंदणी आहे आणि सर्वांनी मिळून आपला नेता कोण हे निवडणूक आयोगालाही सांगितलेलं आहे. तरीही राज्यपालांनी निवडणूक आयोगात नमूद असलेल्या पक्षाच्या नेत्याला महत्व दिलं नाही. त्यांनी दुसराच नेता पक्षाचा नेता म्हणून मान्य केला, असं सिब्बल म्हणाले.

एकनाथ शिंदेंवर केला घणाघात
कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं. “विश्वासघात केला म्हणून त्यांना आज मुख्यमंत्रीपद मिळालं. संविधानाच्या बाहेर, घटनात्मक कायद्याच्या तत्त्वांच्या बाहेर राहून विधिमंडळ पक्षातील एखाद्या गटाला राजकीय पक्ष म्हणून मान्यता द्यावी आणि तेही निवडणूक आयोगाकडे न जाता, नोंदणी न करता- असा कोणता राजकीय पक्ष असतो?”, असं कपिल सिब्बल म्हणाले.

तुम्ही म्हणता की मीच नेता आहे. कोणत्या धर्तीवर तुम्ही असा दावा करता? तुम्हाला २२ जून रोजी पदावरुन काढून टाकण्यात आलं होतं. मग तुम्ही नेते कसे? त्यांनी काल युक्तिवाद केला की विधीमंडळाच्या बाहेर व्हिप कसा लागू होऊ शकतो? मग ते आसाममध्ये काय करत होते? तुम्ही आसाममध्ये भाजपच्या कुशीत बसला होता आणि एका राजकीय पक्षाने दिलेला व्हिप मोडलात, असं जोरदार युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *