महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई -सध्या महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या बाबत सुरु असलेल्या गोंधळाविषयी राज्यात अनेक चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहिलं आहे. मे महिना संपत आला तरी या परीक्षांचा निर्णय होत नाही आणि त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे असं राज ठाकरेंनी राज्यपालांना सांगितले आहे.
राज ठाकरेंनी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती भयंकर असल्याने गेल्या २ महिन्यापासून देशात लॉकडाऊन सुरु आहे. मुंबई आणि पुण्याची परिस्थिती पाहता आणखी किती काळ लॉकडाऊन राहील याचं भाकीत कोणीच करु शकत नाही. लॉकडाऊन शिथिल केला तरी कोरोना संपला असं होत नाही, अशा परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या विविध शाखांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याविषयी महाराष्ट्राच्या सन्मानीय राज्यपालांना पत्र.#लढाकोरोनाशी #विद्यार्थ्यांचामनसेआवाज #महाराष्ट्र #UniversityExams #FinalYearExam #MaharashtraFightsCorona@maha_governor pic.twitter.com/iIjLYgF0la
— Raj Thackeray (@RajThackeray) May 26, 2020
त्याचसोबत या रोगाचा प्रार्दुभाव किती जबरदस्त आहे हे आपण जाणता, मग इतक्या मोठ्या संख्येने या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर काढून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य घालण्यामागचं नक्की प्रयोजन काय? लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचं होणारं नुकसान जाणून देशाने इतका मोठा लॉकडाऊन केला, कारण लोकांचा जीव वाचला तर पुढे शक्य आहे. मग याच न्यायाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यायला हरकत काय आहे? असं राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, परीक्षा रद्द करणे म्हणजे सरसकट विद्यार्थ्यांना पास करणे असं होत नाही. आधीच्या सेमिस्टर्स आणि महाविद्यालयांनी घेतलेल्या अंतर्गत परीक्षांच्या गुणांच्या आधारावर किंवा काही प्रोजेक्ट्स देऊन अथवा इतर अनेक पद्धतीने विद्यार्थ्यांचा अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करता येईल, अनेक शिक्षणतज्ज्ञांनी या विषयांचे मार्ग तुम्हाला सुचवले असतील पण जर ते नसतील तर आमचं शिष्टमंडळ विद्यापीठांना याविषयी नक्की मार्गदर्शन करेलं असंही राज ठाकरेंनी पत्रात नमूद केले आहे.