जळगाव जिल्ह्यातून हृदयद्रावक घटना ; लेकाचा दहावीचा पेपर, तिकडं वडिलांचं निधन; परीक्षा देऊन बाबांना अग्नी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१८ मार्च । जळगाव : गेल्या एक ते दोन महिन्यांपासून आजारी असलेल्या वडिलांचे निधन झाले. घरात वडिलांचा मृतदेह आणि दुसरीकडे मुलाने दहावीची परीक्षा दिली. चोपडा तालुक्यातील चहार्डी गावात शुक्रवारी ही भावनिक घटना घडलीय. गणेश मोहन मोहिते (वय ३३, रा. चहार्डी) असं निधन झालेल्या पित्याचे नाव आहे.

चोपडा तालुक्यातील चहार्डी गावात आई जिजाबाई, पत्नी शिलाबाई, बहीण आणि मुलगा यश यांच्यासह गणेश मोहिते हे वास्तव्यास होते. ते ग्रामपंचायतीत सफाई कर्मचारी होते. गणेश मोहिते यांचा मुलगा चहार्डी येथील स्व. श्यामराव शिवराम पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत आहे. गेल्या एक ते दोन महिन्यांपासून ते आजारी होते. त्यामुळे गणेश मोहिते हे घरी होते. मात्र, काल शुक्रवारी गणेश मोहिते यांचं दीर्घशा आजाराने निधन झालं आणि गेल्या काही दिवसांपासून जीवन मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर थांबली.

एकीकडे वडिलांचे निधन होऊन घरात त्यांचा मृतदेह तर दुसरीकडे यशचा दहावीचा पेपर होता. शाळेचे मुख्याध्यापक व्ही.आर सोनवणे यांनीही यशचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्याच्या कुटुंबियांची तसेच यशची समजूत घातली. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यशने भावनांना आवर घातला आणि काळजावर मोठा दगड ठेवत यश पेपर देण्यासाठी गेला. शाळेचे शिक्षक त्याला पेपर देण्यासाठी दुचाकीवरुन घेऊन गेले. वडिलांच्या निधनाचे मोठे दुःख मनात ठेऊन यशने विज्ञान विषयाचा पेपर दिला.

शिकून मोठा होणार आणि वडीलांचे स्वप्न पूर्ण करणार
यशच्या पेपरमुळे अंत्ययात्रेची वेळ दुपारी ठेवण्यात आली होती. यश पेपर देऊन घरी आल्यानंतर त्याचे वडील गणेश मोहिते यांचे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. खेळण्या – बागडण्याच्या आणि शिकण्याच्या वयात यशचे पितृछत्र हरपले असून यावेळी अंत्यसंस्काराला उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. यश हा एकुलता एक मुलगा आहे. घरातील कर्ता पुरूष गेल्याने मोहिते कुटुंबियांवर मोठा दुख:चा डोंगर कोसळला आहे.

 

मुलगा शिकून मोठा व्हावा, असं गणेश मोहिते यांचे स्वप्न होते. त्यानुसार चांगला अभ्यास करुन उच्चशिक्षण घेणार असून वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे अश्रूंना मोकळी वाट करुन देत यशने सांगितलं. कर्ता पुरूष केल्याने या कुटुंबांची जबाबदारी आता त्यांचा मुलगा यश तसेच त्यांच्या पत्नी शिलाबाई यांच्यावर येऊन पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *