गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार? मनसे नेत्याने दिली महत्वाची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ मार्च । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या गुढीपाडव्याला होणाऱ्या सभेचा टिझर जारी झाला आहे. धर्म आणि मराठी या दोन विषयांवर वाहिलेला हा टिझर चांगलाच चर्चेत आला आहे. गुढीपाडव्याला होणाऱ्या या सभेत राज ठाकरे काय बोलणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. यामुळे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी राज ठाकरे यांची सभेसंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी पाहता जनतेची भावना राज ठाकरे आपल्या भाषणातून व्यक्त होईल, त्याबद्दल ते भाष्य करतील, असे सरदेसाई यांनी सांगितले.

टीव्ही ९ मराठीशी बोलताना नितीन सरदेसाई यांनी सांगितले की, राजसाहेब काय बोलणार याची उत्सुकता महाराष्ट्र सैनिक आणि महाराष्ट्रातल्या जनतेलाच नव्हे, तर संपूर्ण देशाला लागून राहिली आहे. गेल्या दोन अडीच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या काही गोष्टी घडल्या त्यावर साहेब बोलतील अशी अपेक्षा आहे, त्यामुळे आम्हाला सुद्धा ते काय बोलतील याची उत्सुकता आहे.

यंदाच्या सभेत कुणी दुसऱ्या पक्षातले विशेष अतिथी असणार का? यावर बोलताना नितीन सरदेसाई म्हणाले, आजवर जितक्या सभा झाल्या तितक्या आमच्या पक्षाच्याच होत्या. त्यात कुणी वेगळं दिसलं नाही. त्यामुळे यावेळीही तसंच होईल, असं मला वाटतं. राज ठाकरे यांच्या सभास्थानी यावेळेस सर्वात मोठ्या LED स्क्रिन लावण्यात येणार आहे. त्या माध्यमातून अनेकांना सभेचा लाभ घेता येईल. राजसाहेब हे कलासक्त व्यक्ती आहेत, त्यामुळे ते जे काही करतात ते देखणं असतं. त्यांच्या संकल्पना प्रत्यक्षात आणणं ही आमची जबाबदारी आहे.

गुढीपाडव्याला पिक्चर दिसणार?
गुढीपाडव्याला होणाऱ्या सभेत राज ठाकरे पिक्चर ते दाखवतीलच, त्यांनी स्वतःच सांगितलं आहे, त्यामुळे ते दाखवतीलच. आता त्याला लाव रे तो व्हिडीओ म्हणायचं की अजून काही हे तुम्ही ठरवा. मनसेच्या प्रत्येक सभेला लाखांच्या पुढे गर्दी होते, यावेळी सुद्धा होईल, असा दावा सरदेसाई यांनी केला.

अयोध्या दौरा कधी
राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाला नव्हता, तर पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे जी काही पुढची तारीख असेल, ती तुम्हाला कळवली जाईल, असे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविषयावर त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *