महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ मार्च । राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावऊ तसेच गारपीठीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यादरम्यान, आता पुढील ४ दिवस देखील राज्यात पुन्हा एकदा मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
या आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचं अवकाळीने आणखी चिंता वाढवली आहे. श्रीलंकेपासून विदर्भापर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यंतच्या हवेच्या जाडीत दक्षिणोत्तर पसरलेला हवेच्या कमी दाबाचा आस आणि त्यातून महाराष्ट्राच्या भूभागावर तयार झालेली वारा खंडितता प्रणाली यामुळे मंगळवारपासून पुढील पाच दिवस म्हणजे शनिवार, २५ मार्चपर्यंत राज्यात पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
कोणत्या जिल्ह्यांत होणार पाऊस?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात या आठवड्यात देखील पावसाची शक्यता कायम आहे. यामध्ये मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी येथे गुरुवारपर्यंत हलक्या सरींची शक्यता आहे, तर सिंधुदुर्गात आज, बुधवारी पाऊस पडू शकेल.