गुढीपाडवा का साजरा केला जातो ? वाचा, गुढीबाबतचे महत्त्वाचे संदर्भ

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ मार्च । आज गुढीपाडवा… म्हणजे नवीन वर्षांचा पहिला दिवस. या दिवशी महाराष्ट्रातील लोक गुढी उभारतात, म्हणूनच या सणाला आपल्याकडे गुढी पाडवा म्हणतात. बांबूच्या वर चांदी, तांबे किंवा पितळाचा उलटा कलश ठेवला जातो आणि तो सुंदर साडी किंवा रेशमी कापडाने सजवला जातो. साधारणपणे हे कापड भगव्या रंगाचे आणि सिल्कचे असते. गुढीला कडुलिंबाची पाने, आंब्याचा डगळा आणि लाल फुले यांनी सजवली जाते. घराच्या छतासारख्या उंच जागेवर गुढी ठेवली जाते, जेणेकरून ती दुरूनच दिसते. अनेक जण घराच्या मुख्य दरवाजा किंवा खिडक्यांवरही लावतात.

सर्वात आधी पाहूयात कोणत्या ठिकाणी गुढी पाडवा कोणत्या नावाने साजरा केला जातो.

1. गोवा आणि केरळमधील कोकणी समाज गुढी पाडव्याला संवत्सर पडवो म्हणून साजरा करतो.

2. कर्नाटकात गुढीपाडव्याचा हा सण युगाडी म्हणून ओळखला जातो.

3. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये गुढी पाडवा उगाडी म्हणून साजरा केला जातो.

4. काश्मिरी हिंदू हा दिवस नवरेह म्हणून साजरा करतात.

5. मणिपूरमध्ये या दिवसाला सजिबु नोंगमा पानबा किंवा मेइतेई चेइराओबा म्हणतात.

6. चैत्र नवरात्रीची सुरुवातही याच दिवशी होते.

गुढीचे महत्त्व –

गुढीपाडव्याशी अनेक गोष्टी निगडित आहेत. त्यातील काही खास पाहुया-

1. सम्राट शालिवाहनने शकांचा पराभव केल्याच्या आनंदात लोकांनी घरोघरी गुढी उभारली होती.

2. छत्रपती शिवरायांच्या विजयाची आठवण म्हणून काही लोक गुढी लावतात.

3. भगवान ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली, असेही मानले जाते. त्यामुळे गुढीला ब्रह्मध्वज देखील मानले जाते. याला इंद्रध्वज असेही म्हणतात.

4. 14 वर्षांचा वनवास संपवून प्रभु श्रीराम अयोध्येत परतल्याच्या स्मरणार्थ काही लोक गुढीपाडव्याचा सण साजरा करतात.

5. गुढी लावल्याने घरात समृद्धी येते असे मानले जाते.

6. गुढीला धर्मध्वज असेही म्हणतात; म्हणून त्याच्या प्रत्येक भागाचा स्वतःचा विशिष्ट अर्थ आहे.

7. रब्बी पीक काढणीनंतर दुबार पेरणी केल्याच्या आनंदात शेतकरी हा सण साजरा करतात. चांगले पीक येण्यासाठी ते या दिवशी शेतात नांगरणी करतात.

8. हिंदूंमध्ये संपूर्ण वर्षभरात साडेतीन मुहूर्त अत्यंत शुभ मानले जातात. हे साडेतीन मुहूर्त आहेत – गुढी पाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा आणि दिवाळी हे अर्धे मुहूर्त मानले जातात.

महाराष्ट्रीय गुढीचे लिखित साहित्यिक संदर्भ

इ. स. 1278 च्या आसपास पंडित म्हाइंभट सराळेकर रचित लीळाचरित्रात, लीळा 208 : देमती तुरंगम आरोहणी मध्ये ….

‘ तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते : तेयापूढें सांघीतलें : मग तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक रंगमाळीका भरवीलीया : गुढी उभविली : उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेउनि साउमे आले :… ‘

असा उल्लेख येतो.

संत ज्ञानेश्वरांच्या (इ.स.1275–1296) ज्ञानेश्वरीत अध्याय 4, 6 आणि 14 मध्ये

“अधर्माचि अवधी तोडीं ।

दोषांचीं लिहिलीं फाडीं ।

सज्जनांकरवी गुढी ।

सुखाची उभवीं ॥ ५० ॥” ;

“ऐकें संन्यासी आणि योगी ।

ऐसी एक्यवाक्यतेची जगीं ।

गुढी उभविली अनेगीं ।

शास्त्रांतरी ॥ ५२ ॥”;

“माझी अवसरी ते फेडी ।

विजयाची सांगें गुढी ।

येरु जीवीं म्हणे सांडीं ।

गोठी यिया ॥ ४१० ॥”

असे उल्लेख येतात. यावरुन महाराष्ट्रातील गुढी उभारण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे पुरावे मिळातात.

गुढीवरुन वाद

गुढीवर कलश पालथा ठेवण्यात येत असल्याने काही लोकांनी या प्रथेला विरोधही केला होता. मात्र, काळानुसार तो मावळला देखील. याविषयी स्पष्टीकरण देतांना जाणकार तर्क सांगतात की, मुळात ‘कलश पालथा ठेवणे, हे अशुभ असते’, हे कोणी ठरवले ? पूर्वीच्या काळी एखादी व्यक्ती बाहेर गेली आणि तिला येण्यास विलंब झाल्यास उंबर्‍यावर पालथा घडा ठेवून तिची वाट बघितली जात असे. याचा अर्थ चांगल्याची वाट बघणे. गुढीवर पालथा कलश ठेवणे म्हणजे नववर्षादिनापासून ‘हिंदू चांगल्या दिवसांची वाट पहातात’, असाही आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *