महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ मार्च । मुंबईत दुसरी हाजी अली उभारण्याचा डाव सुरु आहे, असा आरोप करताना याचे थेट पुरावेच गुढी पाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी सादर केले. त्याचवेळी त्यांनी इशारा दिला. जर यावर कारवाई झाली नाही तर मनसे पद्धतीने उत्तर देऊ असे बजावले होते. त्यानंतर प्रशासन जागे झाले आहे. आज सकाळीच माहिम दर्ग्यातील अनधिकृत बांधकामाची मेरिटाईम बोर्डाकडून पाहणी केली. आता मनसे नेतेही पाहणी करणार आहेत.
राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यात मुंबईत माहीमच्या समुद्रात अनधिकृत दर्गा बांधण्यात आल्याचा व्हिडिओ दाखवला होता. यावर त्वरीत कारवाई करा, नाहीतर गणपती मंदिर बांधू असा इशारा राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला होता. राज ठाकरे यांची सभा संपल्यांनतर काही क्षणात मुंबई महापालिकेने यावर स्पष्टीकरण दिले होते.
राज ठाकरे यांनी व्हिडिओ दाखवत सरकारला आव्हान दिले. मुंबईमध्ये माहीमच्या समुद्रात नवं हाजीअली तयार करण्याचा डाव असल्याचा आरोप राज यांनी केला होता. समुद्रात अनधिकृतपणे दर्गा बांधला गेल्याचा व्हिडिओ राज ठाकरेंनी दाखवला आणि आज सकाळी प्रशासनाचे अधिकारी दाखल झालेत.
राज्यकर्त्यांचे आणि प्रशासनाचं दुर्लक्ष असलं की काय तयार होते, त्याचा दाखला देत राज ठाकरे यांनी हा व्हिडिओ जाहीर सभेत दाखवला. त्याचबरोबर महिनाभरात कारवाई झाली नाही तर पुढे काय होते ते बघा. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असाल तर आम्ही जे काही करु त्याकडेही दुर्लक्ष करावे लागेल, असा इशारा दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रशासनाने तात्काळ पावले उचलत पाहणी केली.