महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ मार्च । राजधानी दिल्लीच्या गल्लीबोळात ‘मोदी हटाओ, देश बचाओ’ असे पोस्टर लागल्याने भाजपचा चांगलाच तीळपापड झाला. प्रिंटिंग प्रेस कायद्याचा हवाला देत दिल्ली पोलिसांनी लगोलग 100 गुन्हे दाखल केले आहेत. दुसरीकडे आम आदमी पार्टीच्या कार्यालयावर पाळत ठेवून एका गाडीत असलेले पोस्टरही पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांना गैरव्यवहाराच्या प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर आप आणि भाजपमधील राजकीय संघर्ष विकोपाला गेला आहे. त्यात आता पोस्टरवॉरची भर पडली. दिल्लीच्या गल्लीबोळात ‘मोदी हटाओ, देश बचाओ’ असे पोस्टर लागल्याने भाजपच्या संतापाचा भडका उडाला. आयपी स्टेट पोलीस ठाण्याच्या एका हवालदाराने पप्पू मेहता या व्यक्तीला पोस्टर लावताना पकडले. त्याच्याकडून 38 पोस्टर जप्त करण्यात आले.
दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी दोन छापखान्यांना प्रत्येकी 50 हजार पोस्टर छापण्याची ऑर्डर देण्यात आली होती, अशी माहिती दिली. या छापखान्याच्या कर्मचाऱयांनी रविवार रात्रीपासून दिल्लीच्या गल्लीबोळात ‘मोदी हटाओ, देश बचाओ’ असे पोस्टर्स लावले. या पोस्टरवर छापखान्याचे नाव नव्हते. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीकडून माहिती मिळाल्यानंतर त्याच्या मालकाला अटक करण्यात आली, असे पाठक यांनी सांगितले.