अमृतपालची पत्नी युकेत काय करत होती? दीड महिन्यांपूर्वीच लग्न, मोठे षडयंत्र…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ मार्च । खलिस्तान समर्थक आणि वारिस पंजाब देचा प्रमुख अमृतपालच्या शोधात पंजाब पोलीस आकाश पाताळ एक करत आहेत. जेव्हा तो खुलेआम फिरत होता, पोलिसांना मारहाण करत होता तेव्हा हेच पोलीस हातावर हात धरून बसलेले होते. महाराष्ट्रातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अमृतपालचे दीड महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. यामुळे त्याची माहिती पत्नीला असेल म्हणून तिची चौकशी केली असता मोठे कनेक्शन समोर आले आहे. अमृपालची पत्नी किरणदीप कौर देखील देशविरोधी कारवायांत सहभागी असल्याचे समोर आले आहे. ती आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना बब्बर खालसासाठी काम करत होती. या प्रकरणी तिला २०२० मध्ये युकेमध्ये ताब्यात घेण्यात आले होते असेही समोर आले आहे. लग्नापूर्वी ती तिथे राहत होती.

प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या गुप्त माहितीनुसार ती युकेमध्ये बब्बर खालसासाठी काम करत होती. युकेमध्ये ती या दहशतवादी संघटनेसाठी फंड गोळा करायची. २०२० मध्ये तिच्यासह तिच्या पाच सहकाऱ्यांना तेथील सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले होते. पंजाब पोलीस आता तिच्या आणि तिच्या नातेवाईकांच्या बँक खात्यांची माहिती काढत आहेत.

किरणदीप कौरच्या काही खात्यांमध्ये परदेशातून पैसे ट्रान्सफर झाल्याचेही सांगितले जात आहे. याचीही चौकशी करण्यात येत आहे. मात्र याबाबत कोणताही पोलीस अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीय. सुरक्षा यंत्रणांना काही सुगावा लागल्यास किरणदीपला ताब्यात घेतले जाऊ शकते. अमृतपालच्या भावाला पोलिसांनी यापूर्वीच ताब्यात घेतले आहे. अमृतपालची आई बलविंदर कौर, वडील तरसेम सिंग आणि काका सुखचैन सिंग आणि आजी चरण कौर यांचीही बुधवारी चौकशी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *