महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ मार्च । ज्येष्ठ बौद्ध धर्मगुरु दलाई लामा (Buddhist leader Dalai Lama) यांनी तिबेटी बौद्ध धर्मातील तिसरा सर्वात महत्त्वाचा आध्यात्मिक धर्मगुरु म्हणून एका अमेरिकन मंगोलियन मुलाचं (Mongolian Boy) नाव दिलं आहे.
टाईम्सच्या अहवालानुसार, 600 मंगोलियन लोक त्यांच्या नवीन आध्यात्मिक नेत्याचा उत्सव साजरा करण्यासाठी जमले होते. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये लाल कपडे घातलेला आणि मास्क घातलेला एक मुलगा 87 वर्षीय दलाई लामा यांना भेटताना दिसत आहे.
मुलाचं वय अवघं 8 वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे. मंगोलियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा मुलगा जुळ्या मुलांपैकी एक आहे. दलाई लामा यांनी या मुलाचं वर्णन 10 व्या खलखा जेत्सून धम्पा रिनपोचे यांचा पुनर्जन्म असं केलंय. बौद्ध धर्मात (Buddhism) धार्मिक नेत्यांच्या पुनर्जन्माला विशेष महत्त्व दिलं जातं.
धर्मशाळा, हिमाचल प्रदेश इथं धार्मिक नेत्यांचा पुनर्जन्म सोहळा आयोजित करण्यात आला होता. इथं 600 मंगोलियन लोक त्यांच्या नवीन आध्यात्मिक नेत्याचा उत्सव साजरा करण्यासाठी जमले होते. दलाई लामाही इथं राहतात. या सोहळ्यामुळं मंगोलियाचा शेजारी चीन नाराज होण्याची शक्यता आहे.
द टाइम्समधील एका वृत्तानुसार, दलाई लामा यांनी 2016 मध्ये मंगोलियाला भेट दिली होती. या भेटीवर चीननं जोरदार टीका केली होती. या भेटीचा चीन (China)-मंगोलियन संबंधांवर नकारात्मक परिणाम झाल्याचं चिनी सरकारनं म्हटलंय.
उलानबटोर सोडण्यापूर्वी दलाई लामा म्हणाले, तिबेटी बौद्ध धर्मातील तिसरे सर्वात महत्वाचे लामा, जेत्सुन धम्पा, मंगोलियामध्ये पुनर्जन्म घेतले होते. अनेक दिवसांपासून त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते. तसंच, मंगोलियन मुलगा अगुईडाई आणि अचिल्टाई अल्तानार या जुळ्या मुलांपैकी एक आहे. मात्र, दोघांपैकी कोणता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.