महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २६ मार्च । आज विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातही विजासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, पावसाळी वातावरण निवळू लागताच राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. कमाल तापमानात आणि उकाड्यात वाढ झाली आहे.
हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारपासून, झारखंड, छत्तीसगड, विदर्भ, तेलंगणा ते दक्षिण अंतर्गत कर्नाटकपर्यंत समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यातच ईशान्य राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून आसाम पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे आज (ता. 26) मराठवाडा तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तर विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तापमानात चढ-उतार
राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच असून, उकाड्यात वाढत होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 37.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपूरी, वर्धा येथे कमाल तापमान 37 अंशांच्या पुढे होते. उर्वरीत राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 31 ते 35 अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानाचा पारा बहुतांश ठिकाणी 12 अंशांच्या पुढे कायम आहे.
अवकाळीमुळे राज्यात 1.39 लाख हेक्टर पिकांचे नुकसान
दरम्यान, अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे राज्यात 1.39 लाख हेक्टर पिकांचे नुकसान मार्च महिन्यात दोन टप्प्यांत झालेल्या गारपिटीत राज्यात तब्बल 1 लाख 39 हजार हेक्टरवरील लाखो रुपयांच्या रब्बी पिकांचे, फळबागांचे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात. नांदेड जिल्ह्यातील 23,821 हेक्टरवरील पिकांना फटका बसला.
पंचनामे 2 दिवसांत पूर्ण होतील, असे मुख्यमंत्र्यांनी 20 मार्च रोजी सांगितले होते, पण 25 मार्चपर्यंत ते झाले नव्हते. यादरम्यान मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण मात्र वाढत आहे.
गारपीटग्रस्तांसाठी मदतीची घोषणा नाही
27 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शनिवारी (25 मार्च) समारोप झाला. यात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 मार्च रोजी लोकप्रिय घोषणांचा अर्थसंकल्प मांडला. मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा वारंवार शब्द देणारे शिंदे-फडणवीस सरकार गारपिटीमुळे उद्ध्वस्त हजारो शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची घोषणा मात्र करू शकले नाही.