ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीचा शॉक?:प्रति युनिट अडीच रुपयांनी महागण्याची शक्यता

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ मार्च । राज्यात 1 एप्रिलपासून वीज जवळपास अडीच रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोग येत्या शुक्रवारी (31 मार्च) विजांच्या दरनिश्चितीबाबतचा आदेश जारी करणार आहे. त्यामुळे मार्च एंडलाच ग्राहकांना वीजदरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे.

आयोगासमोर जनसुनावणी पार
महावितरणसह खासगी वीज कंपन्यांनी सादर केलेल्या वीज दर निश्चितीच्या याचिकेवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर (MERC)जनसुनावणी पार पडली आहे. शुक्रवारी 31 मार्चरोजी वीज नियामक आयोग याबाबतचा आदेश जारी करणार आहे. त्यामुळे राज्यात वीज दरवाढीचा बॉम्ब शुक्रवारी फुटण्याची शक्यता आहे.

राज्यात नवे वीजदर 1 एप्रिलपासून लागू करावे लागणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर नियामक वीज आयोगाचे वीज दराचे आदेश तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे मार्च महिन्याच्या अखेरच्या दिवशी आयोग आपला आदेश जारी करणार आहे. त्यामुळे आयोग काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महावितरण, ग्राहक संघटनेचे वेगवेगळे दावे
महावितरणने 2023-24 आणि 2024-25 या दोन वर्षांसाठी 67 हजार कोटी रुपयांच्या महसुलाची मागणी केली आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांच्या वीजेच्या दरात प्रतियुनिट अडीच रुपयांची वाढ होणार असल्याचा दावा ग्राहक संघटनांनी केला आहे. मात्र, प्रशासनाने केवळ एक रुपया दरवाढ होईल, असे सांगितले आहे. महावितरणचे संचालक विश्वास पाठक यांनी सांगितले की, तूट भरून काढण्यासाठी 2023-24 व 2024-25 या दोन आर्थिक वर्षांत दरवर्षी 14 आणि 11 टक्के सरासरी दरवाढ प्रस्तावित आहे. ती एक रुपयाच्या जवळपास आहे. तसेच स्थिर आकार, वीज आकार व वहन आकार यांचाही समावेश केलेला आहे.

तर, ग्राहक संघटनांचे म्हणणे आहे की, स्थिर आकार, वीज आकार व वहन आकार यांचा पूर्ण हिशोब केल्यास ग्राहकांना प्रतियुनिट अडीच रुपयांनी वीज महाग मिळणार आहे.

असे वाढणार प्रतियुनिट दर
महावितरणने इंधन समायोजन आकारासह 25 टक्के दरवाढीची मागणी करणारा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. घरगुती ग्राहकांसाठी सध्या इंधन समायोजन आकारसह वीजेचा दर प्रति युनिट 7.79 रुपये आकारला जातो. वीज नियामक आयोगाने महावितरणचा प्रस्ताव मान्य केल्यास वीजेचा दर 2023-24 मध्ये 8.90 रुपये, तर 2024-25 मध्ये 9.92 रुपये होणार आहे. म्हणजेच वीजेचे दर प्रतियुनिट अनुक्रमे 1.11 रुपये आणि 2.13 रुपयांनी वाढणार आहेत. तर, वीज शुल्काचा भार पकडून ही वाढ 2.55 रुपयांपर्यंत होणार असल्याचा दावा राज्य वीज ग्राहक संघटेनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केला आहे.

अदानी, टाटाचीही वीज महागणार
याशिवाय अदानी इलेक्ट्रिसिटीने 2023-24 या वर्षासाठी 2 ते 7 टक्के, तर टाटा पॉवरने 10 ते 30 टक्के एवढ्या दरवाढीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे दोन्ही कंपन्यांनी 2024-25 या वर्षामध्ये मात्र वीज दरात कपातीचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर वीज आयोगाने फेब्रुवारी आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाईन जनसुनावणी घेत ग्राहकांची बाजू ऐकून घेतली आहे. त्यानुसार दरवाढीबाबत अवश्यक असलेले सर्व काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे शुक्रवार, 31 मार्च रोजी सर्व वीज कंपन्यांच्या वीजदर निश्चितीचे आदेश येतील.

वीज चोरीची भरपाई दर वाढवून?
दरम्यान, राज्यात वीज गळती व वीज चोरीवर नियंत्रण नाही. मराठवाड्यातील काही फिडरवर 80 ते 99 टक्क्यांपुढे वीज गळती होत आहे. यामुळे वीज हानी वाढली आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्याऐवजी या नुकसानभरपाईसाठी वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर करून ग्राहकांकडून तो वसूल केला जात आहे, असा आरोप वीज क्षेत्रातील अभ्यासक अजित देशपांडे यांनी केला आहे.

महाराष्ट्रात महागडी वीज
आंध्र प्रदेशमध्ये आधिभारासह कमीत कमी 1.9 आणि जास्तीत जास्त 9.75 रुपये, गुजरात 3.5 ते 5.2, दिल्ली 3 ते 8 रुपये, गोवा 1.6 ते 4.5 रुपये वीज दर आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्रात 5.36 ते 15.56 रुपये प्रतियुनिट दराने वीज मिळते. म्हणजेच इतर राज्यांच्या तुलनेत तीन पटीपर्यंत वीज बिल जास्त आहे. तरीही नव्याने वीज दरवाढीचा प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगाकडे दाखल केला आहे. त्यामुळे राज्यभरात नाराजी व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *