महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ मार्च । गुन्हा घडला तेव्हा आरोपी अल्पवयीन होता, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने पुण्यासह महाराष्ट्राला हादरवून सोडणार्या राठी हत्याकांडातील आरोपीच्या मुक्ततेचा आदेश आज दिला. नारायण चेतनराम चौधरी असे मुक्त करण्यात आलेल्या दोषीचे नाव आहे. तो गेली २८ वर्ष कारागृहात होता.
पुण्यासह महाराष्ट्राला हादरवणारे राठी हत्याकांड
पुण्यातील शीलविहार कॉलनीतील हिमांशू अपार्टमेंटमध्ये फ्लॅटमध्ये केसरीमल राठी हे आपल्या कुटुंबासह राहत होते. केसरीमल यांचे कोथरूडमध्ये ‘सागर स्वीट्स’ नावाचे दुकान होते. या दुकानात काम करणाऱ्या राजू राजपुरोहित व जितेंद्र नैनसिंग गेहलोत याने नारायण चौधरी या साथीदाराच्या मदतीने केसरीमल यांचे अपहरण करून पैसे लुबाडण्याचे कारस्थान रचले होते. यातूनच २६ ऑगस्ट १९९४ रोजी राठी ह्त्याकांड घडले होते. राठी कुंटुंबातील ७ जणांची हत्या करण्यात आली होती.
28 years after murder, Supreme Court orders release of death row convict after finding he was a child at the time of crime#SupremeCourt #SupremeCourtOfIndia
Read more here: https://t.co/1lFyF8dCPB pic.twitter.com/5X34dMlN7a
— Bar & Bench (@barandbench) March 27, 2023
न्यायालयाने आरोपींना ठोठवली होती फाशीची शिक्षा
राठी हत्याकांडातील आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयासह अन्य न्यायालयांनीही गुन्हा घडला तेव्हा नारायण चेतनराम चौधरी यांचे वय २० ते २२ वर्ष नोंदवले होते. चौधरी आणि त्याचा साथीदार जितेंद्र नैनसिंग गेहलोत या दोघांनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज सादर केला. ऑक्टोबर २०१६ मध्ये राष्ट्रपतींनी गेहलोतची फाशीची शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेच्या शिक्षेत केले होते.
नारायण चौधरीने दाखल केली होती पुनर्विचार याचिका
या वेळी नारायण चौधरी याने त्याची दयेची याचिका मागे घेतली. त्याऐवजी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. गुन्ह्याच्या वेळी तो अल्पवयीन असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला होता. यासाठी २०१५ मध्ये राजस्थानमधील त्याच्या शाळेतील जन्म नोंदीचा पुरावा न्यायालयात सादर करण्यात आला होता. जानेवारी २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीशांना चौधरी याच्या वयाची चौकशी करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने नारायण याच्या जन्मवर्षाबाबतचे निष्कर्ष सीलबंद कव्हरमध्ये सर्वोच्च न्यायालयात सादर केले होते.
नारायण चौधरीच्या मुक्ततेचा आदेश
मे २०१९ मध्ये न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि संजीव खन्ना यांचा समावेश असलेल्या सुट्टीतील खंडपीठाने नारायण चौधरी याने शाळेतील जन्मनोंदीचा सादर केलेला पुरावे वस्तुनिष्ठ असल्याचे स्पष्ट केले होते. आज ( दि. २७) न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, के.एम जोसेफ आणि हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने नारायण चौधरी याचा खुनाच्या गुन्ह्यावेळी अल्पवयीन असल्याचा दावा खरा असल्याचा निष्कर्ष काढला. तसेच त्यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले.