रात्री अंत्यसंस्कार ; तरीही सकाळीच गिरीश बापट यांचं जनसंपर्क कार्यालय सुरू

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० मार्च । भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं काल दीर्घ आजाराने निधन झालं. ते 72 वर्षाचे होते. त्यांच्या निधनावर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. काल रात्रीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराला सर्वच पक्षाचे नेते उपस्थित होते. बापट यांचे सर्वच पक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काला मोठी गर्दी लोटली होती. काल रात्री अंत्यसंस्कार झाल्यानंतर आज सकाळी गिरीश बापट यांचं जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आलं. नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून हे कार्यालय सुरू करण्यात आलं आहे.

गिरीश बापट यांच्या पार्थिवावर पुण्याच्या वैकूंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. त्यांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील असंख्य बडे नेते उपस्थित होते. तसेच सर्व सामान्य जनताही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती. यावेळी बापट यांना शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला.

24 तासाच्या आत कार्यालय सुरू
गिरीश बापट यांचा निधन होऊन 24 तास उलटण्याच्या आतच गिरीश बापट यांचं जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आलं. रोजच्या वेळेनुसार साडेनऊ वाजता आजही गिरीश बापट यांचं जनसंपर्क कार्यालय सामान्य लोकांसाठी सुरू ठेवण्यात आलं आहे. काल दुपारी गिरीश बापट यांचं निधन झालं असून काल रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि 24 तासाच्या आतच गिरीश बापट यांचं जनसंपर्क कार्यालय पुन्हा सुरू करण्यात आलं आहे, त्यासोबतच जनसंपर्क कार्यालयातील दैनंदिन कामे देखील सुरूच ठेवण्यात आली आहेत.

लोकांचा खासदार
गिरीश बापट हे खऱ्या अर्थाने लोकांचे खासदार होते. लोकांमध्ये रमणारे आणि लोकांच्या कामासाठी धावून जाणारे खासदार होते. मतदारांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून ते रोज सकाळी 9.30 वाजता आपले जनसंपर्क कार्यालय सुरू ठेवायचे. स्वत: कार्यालयात बसून लोकांच्या समस्या जाणून घ्यायचे. त्यांचे प्रश्न जागच्या जागी सोडवायचे. प्रसंगी मतदार राहत असलेल्या विभागात जाऊन पाहणीही करायचे. पण कुणालाही खाली हाताने पाठवत नसायचे. बापट दिल्लीत असले तरी त्यांचे कार्यालय सुरू असायचे. त्यांच्या ऑफिसातील स्टाफ लोकांची गाऱ्हाणी ऐकून घ्यायचा आणि त्यावर मार्ग काढायचा. मोठ्या समस्या असतील तर बापटांना कळवल्या जायच्या आणि त्या सोडवल्या जायच्या.

बापट गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांचं कार्यालयात येणं कमी झालं होतं. पण त्यांचं कार्यालय बंद नव्हतं. जनसंपर्क कार्यालय सुरूच होतं. लोकांच्या समस्या जाणून घेतल्या जात होत्या. रुग्णालयातून तर कधी घरातून बापट आवश्यक त्या सूचना द्यायचे. त्यामुळेच काल बापट यांच्या निधनानंतरही त्यांचं कार्यालय सुरू ठेवण्यात आलं. जनसेवा हे बापट यांचं व्रत होतं. तेच सुरू ठेवण्याचं काम बापट कुटुंबीयांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *