महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – ठाणे – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे -इटलीत लॉकडाऊन फसला तो तिथल्या लोकांच्या निष्काळजीपणामुळे. त्यांना लॉकडाऊन ही सुट्टी वाटली आणि ते मौजमजा करायला बाहेर पडले. इतका टिचभर देश असूनही इटली कोरोनाच्या विळख्यात सापडला मी कोरोनातून बरा होऊन घरी आलो म्हणून आता हे ज्ञान पाजळतोय अशी शंका कुणालाही येणं स्वाभाविक आहे. मी फाजील आत्मविश्वासात राहिलो. आपण आता पन्नाशी ओलांडली आहे, पंचविशीतले नाही, याचा अतिउत्साहात मला विसर पडला. राजकारणातील धकाधकीमुळे वेळेवर खाणं नाही, पुरेशी झोप नाही, व्यायामाची सवय मोडलेली, यामुळे माझ्या शरीराची प्रतिकारशक्ती क्षीण झाली आहे हे मी ओळखायला हवं होतं. सबब, हे ज्ञान पाजळणं नाही तर मी केलेलं परीक्षण आहे.
तीन आठवड्यांपूर्वी स्टॅनफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक आणि नोबेल पारितोषिक विजेते मायकल लेविट म्हणाले की कोरोनापेक्षा कित्येक पटीने जास्त लोक (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या) लॉकडाउनमुळे मरतील. गावात पोट भरत नाही म्हणून ही माणसं शहरांत आली. परत गावी जाऊन ते कसं पोट भरणार? धरून चालू की आज ना उद्या कोरोनाची साथ ओसरेल. पण मरणशय्येवर पडलेली अर्थव्यवस्था त्यांना पुन्हा शहरात नोकऱ्या देईल? शहरी मध्यमवर्गाचा स्वार्थी, भावनाशून्य चेहरा पाहिलेले कितीजण परत यायला धजावतील? हे साधे प्रश्न प्रश्न जरी स्वतःला विचारले तरी किती भयावह आर्थिक आणि सामाजिक स्थितंतरं यापुढे होणार आहेत याची कल्पना येते आणि प्रा. लेविट यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे लक्षात येतं.
हे सारं सांगण्याचा हेतू इतकाच की आता आपली आयुष्यं हळूहळू पूर्वपदावर आणायला हवीत. एखाद्या धोकादायक आजारापासून स्वतःची काळजी घेणं आणि त्याची दहशत घेऊन कड्याकुलपात दिवाभीतासारखं बसून राहणं यात फरक आहे. दोन वेळा भाकरतुकडा ताटात पडण्यासाठी त्या मजुरांना आज जी शर्थ करावी लागणार आहे, ती वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते. आज शक्यता आहे की तुमच्यापैकी अनेकांना कोरोनाची लागण झाली सुद्धा असेल. पण काहीच लक्षणं दिसत नाहीत म्हणजे तुमच्या शारीरिक प्रतिकारशक्तीने त्यावर मात केली आहे. ज्याला “अँटीबॉडीज” म्हणतात त्या तुमच्या शरीरात तयार झाल्या असतील. अशातूनच आधुनिक वैद्यकशास्त्रात ज्याला हर्ड इम्यूनिटी (समूहाची प्रतिकारशक्ती) म्हणतात ती तयार होते. आपल्याकडे ६०% लोकसंख्येचं सरासरी वय चाळिशीच्या आत आहे. कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली, आणि ताप नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वतःला दोनतीन आठवडे एकांतवासात ठेवलात तरी आरामात बरे व्हाल. काळजी घ्या, भीती बाळगू नका. मानसिक ताण नसेल तर शरीरही साथ देतं. नाहीतर माझ्यासारखी हॉस्पिटलमध्ये पडण्याची पाळी येते.
पुन्हा एकदा सांगतो, कोरोना झालेले ९७ ते ९८% लोक पूर्णतः बरे होत आहेत. तुमची प्रतिकारशक्ती हाच त्यावर एकमेव उपाय आहे.