महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ एप्रिल । उत्तर भारतात पुन्हा वार्याची चक्रीय स्थिती झाल्याने हिमालयात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. त्यामुळे देशाच्या कमाल तापमानात घट होत आहे. महाराष्ट्रातील काही भागांत 5 व 6 एप्रिलदरम्यान हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. हिमालयात पश्चिमी चक्रवात पुन्हा सक्रिय झाल्याने बर्फवृष्टी सुरू झाली आहे. त्यामुळे उत्तर भारत, पूर्वोत्तर राज्यात आगामी पाच दिवस पावसाची शक्यता आहे. तसेच बंगालच्या उपसागरातही चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने दक्षिण भारतात पावसाची शक्यता आहे.
मध्य भारतात पावसाची शक्यता नाही. या वातावरणामुळे मात्र देशाच्या कमाल तापमानात घट होत आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागांत अजूनही ढगाळ वातावरण असून, कोकण वगळता विदर्भ,मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्रात 5 एप्रिल, तर विदर्भ मराठवाड्यात 5 व 6 एप्रिल रोजी हलका पाऊस होईल. दरम्यान, राज्यातील बहुतांश भागांतील कमाल तापमानात रविवारी 2 ते 3 अंशांनी घट झाली होती.