Electric Vehicles : पुणे शहरात ई-वाहनांसाठी ८२ ठिकाणी होणार चार्जिंग केंद्र

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ एप्रिल । पुणे महापालिकेकडून आता खासगी संस्थांच्या सहकार्याने महापालिकेच्या इमारतींमध्ये इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग केंद्र उभे करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानुसार ८२ ठिकाणी चार्जिंग केंद्र उभी करण्याचे निश्‍चित झाले आहे.

राज्य सरकारकडून महाराष्ट्र इलेक्‍ट्रिक व्हेईकल धोरण २०२१ नुसार इलेक्‍ट्रिक वाहनांच्या वापरास प्राधान्य देण्याचे धोरण करण्यात आले आहे. त्यानुसार, पुणे महापालिकेने त्यांचा इलेक्‍ट्रिक व्हेईकल सेलही स्थापन केला आहे. त्याद्वारे विविध घटकांच्या नियमित बैठका घेऊन सूचना दिल्या जात आहेत. शहरातील इलेक्‍ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. भविष्यात या वाहनांच्या चार्जिंगचा प्रश्‍न भविष्यात निर्माण होऊ शकतो, या दृष्टीने शहरात चार्जिंग केंद्र उभारण्यासाठी महापालिकेकडून प्राधान्य दिले जात आहे.

महापालिकेच्या इमारतीमध्ये खासगी संस्थांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संबंधित चार्जिंग स्टेशन्समध्ये दोन आणि चार चाकी वाहनांना चार्जिंग करता येईल, तसेच एक वाहन रांगेत उभे राहू शकते. शहरात एकूण ८२ ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठीच्या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली. त्याबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित केंद्र उभी राहणार आहेत.

असे आहे खर्चाचे गणित

प्रारंभी जागानिश्‍चितीनंतर संबंधित कंपनी केंद्रासाठी वीज जोडणी घेणार आहे. त्याचे बिलही संबंधित कंपनीकडूनच भरले जाणार आहे. तर चार्जिंगसाठी खर्च होणाऱ्या विजेप्रमाणे वाहनचालकांना प्रतियुनिट शुल्क द्यावे लागेल. याबरोबरच वीज, तसेच देखभाल दुरुस्तीचा खर्च वजा करून कंपनीला मिळणाऱ्या नफ्यातील निम्मा हिस्सा महापालिकेला दिला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *