महापालिका निर्णय प्रक्रियेत सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घ्या: आमदार अण्णा बनसोडे

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ एप्रिल । पिंपरी-चिंचवडमधील सर्वपक्षीय खासदार, आमदारांना महापालिका निर्णय प्रक्रियेत विश्वासात घ्यावे. प्रशासकीय राजवटीत राजकीय हेतूने आरोप होऊन शहराच्या लौकिकाला गालबोट लागू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केली आहे.

याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासक राजवट सुरू आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह अनेक लोकोपयोगी आणि महत्वूपर्ण निर्णय घेत आहेत. मात्र, लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेतल्यामुळे काहीप्रमाणात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात महापालिका आयुक्त शेखर सिंह शहरातील सत्ताधारी आमदार, खासदारांच्या मर्जीप्रमाणे काम करीत आहेत, अशी चर्चा आहे. केवळ सत्ताधारी पक्षातीलच नव्हे, तर विरोधी पक्षातील आमदारांनाही विश्वासात घेणे अपेक्षीत आहे.

तसेच, महापालिका निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे नगरसेवक किंवा पदाधिकाऱ्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी होता येत नाही. मात्र, शहरातील दोन खासदार, चार आमदार यांना विचारात घेवून निर्णय घेण्यात यावेत. तीन भाजपाचे व एक राष्ट्रवादीचे आमदार शहराचे प्रतिनिधीत्व करतात. तसेच, शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येक एक खासदार प्रतिनिधीत्व करीत आहेत. या सर्वपक्षीय विद्यमान लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले पाहिजे, अशी आमची भावना आहे, असेही आमदार बनसोडे यांनी म्हटले आहे.

 

…तर अनावश्यक आरोप-प्रत्यारोप होणार नाहीत: बनसोडे

सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्यास अनावश्यक आरोप प्रत्यारोप होणार नाहीत. तसेच, राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे शहराच्या लौकीकाला गालबोट लागणार नाही. आयुक्त शेखर सिंह यांची निर्णयांचा धडाका लावला आहे. शहराच्या भविष्यादृष्टीने हे महत्त्वाचे आहे. पण, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्याबाबत प्रशासनाला सूचना करावी, अशी आग्रही मागणीही आमदार बनसोडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *