महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ एप्रिल । जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. बालवयात मुलांच्या मनात एकमेकांबद्दल जातीय भेदभाव निर्माण होऊ नये, यासाठी राज्य शासनाने तसा निर्णय घेतला आहे.
शिलाई काम करणाऱ्यांना मोठी संधी
राज्यभरातील जवळपास ७० लाख विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात मोफत गणवेश मिळणार आहेत. त्यासाठी राज्य सरकाला प्रत्येकी ६०० रुपयांप्रमाणे अंदाजे ४२३ कोटी रुपयांचा निधी द्यावा लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तो निधी संबंधित शाळांच्या शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग केला जातो. गणवेशाचा रंग व कापड निश्चित करून शाळा व्यवस्थापन समिती गणवेश शिलाई करून घेते आणि शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व मुलांना त्याचे वाटप होते. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास पावणेतीन लाख विद्यार्थी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेतात. त्यातून शिलाई काम करणाऱ्यांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे.