Maharashtra News: वर्षा आणि सागर बंगल्यावरील पाहुणचाराला चाप ; टीकेची झोड उठल्यावर खानपानाच्या बजेटला कात्री

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ एप्रिल । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या खानपानाच्या वारेमाप खर्चावरील टीकेनंतर आता पाहुणचारावरील खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एवढेच नाही, तर वर्षा बंगल्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवास्थानावरील खर्चही आटोक्यात ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी वर्षा व सागर बंगल्यावरील खानपानाचे कंत्राट दोन वेगवेगळ्या खाजगी कंत्राटदारांना देण्यात आले आहेत.

तसेच दोन्ही निवासस्थानावरील खानपानासाठी वर्षाला पाच कोटी रुपयांचा खर्चही मर्यादित करण्यात आला आहे. या निर्णयानुसार वर्षा निवासस्थानी श्री सुखसागर हॉस्पिटॅलिटी, तर सागर निवासस्थानी खानपान सेवा पुरवण्यासाठी मे. छत्रधारी कॅटरर्सला कंत्राट देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी कोणते पदार्थ मिळणार?
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या पाहुण्यांसाठी साधारण व विशेष पदार्थांची यादी तयार करण्यात आली आहे.
साधारण पदार्थांच्या यादीत 44 पदार्थांचा समावेश आहे, तर विशेष पदार्थांच्या यादीत 29 पदार्थ आहेत.
साधारण पदार्थांमध्ये सर्वात स्वस्त पदार्थ वेफर्स असून त्यासाठी कंत्राटदारास फक्त 10 रुपये मिळणार आहेत.
विशेष पदार्थांमध्ये मसाला चहा, कॉफी व ग्रीन टी ही सर्वात स्वस्त असून त्यासाठी फक्त 14 रुपये, तर मसाला दुधासाठी 15 रुपये मोजावे लागणार आहेत.
विशेष पदार्थांमध्ये खाण्यासाठी कोथिंबीर वडी, समोसा, उकडीचे मोदक, स्पेशल पेढा हे सर्वात स्वस्त म्हणजे 15 रुपयांत दिले जाणारे पदार्थ असतील.
महत्त्वाची बाब म्हणजे साधारण व विशेष वर्गवारीत सर्वात महाग हे शाकाहारी व मांसाहारी बफेट आहेत.
साधारण पदार्थांमध्ये शाकाहारी बफेटसाठी 160 रुपये, तर मांसाहारी बफेटसाठी 175 रुपये आकारले जातील.
विशेष पदार्थांच्या यादीत स्पेशल शाकाहारी बफेट 325 रुपयांना, तर मांसाहारी बफेट 350 रुपयांत उपलब्ध करून दिला जाईल.

वारेमाप खर्चावर टीका
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील सरकारकडून होणाऱ्या वारेमाप खर्चावर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानावरील जेवणाचे बील यंदाच्या अधिवेशनात चांगलच गाजलं होती. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चार महिन्याचे जेवणाचे बील 2 कोटी 38 लाख रुपये आले होते. यावर सरकार चहामध्ये सोन्याचा अर्क टाकते का? असा खोचक सवालही अजित पवार यांनी केला होता. त्याला एकनाथ शिंदेंनी विधानसभेत प्रत्युत्तर देखील दिलो होते. कोरोना काळात बंगला बंद असताना किती खर्च झाले, याची माहिती घेतली का? असा सवाल शिंदे यांनी अजित पवार यांना केला. आमच्याकडे गेल्या आठ-नऊ महिन्यात राज्यभरातून सोन्यासारखी माणसे येत आहे. त्यांच्यासाठी चहापाणी करायचं नाही का? आपली ही संस्कृती नाही का?, असा सवाल त्यांनी केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *