महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ एप्रिल । सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे हिट स्ट्रोकचा (उष्माघात) त्रास होण्याची शक्यता असल्याने त्याबाबत काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे. उन्हात फिरणे टाळावे. शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण पुरेसे राहायला हवे. त्यासाठी आहारामध्ये फळे आणि फळभाज्यांचे प्रमाण जास्त असायला हवे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. सकाळी अकरानंतर ऊन जाणवू लागले आहे. तसेच, वातावरणातील उकाडा वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे त्याचा शारिरीक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत विशेष काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.
आहार
चौरस आहार घ्यायला हवा.
शरीराला जास्त पाणी मिळेल अशा फळांचे सेवन करावे.
आहारामध्ये फळभाज्या जास्त प्रमाणात असायला हव्या.
ताजे, पचायला हलक्या पदार्थाचे सेवन करावे.
लिंबू पाणी, ताक, शहाळे अशी पेय घ्यावी.
हीट स्ट्रोक म्हणजे काय ?
उष्माघात म्हणजेच हीट स्ट्रोक किंवा सनस्ट्रोक होय. ही जीवघेणी अवस्था आहे. यामध्य प्रखर तापमानाला सामोरे गेल्याने शरीरातील उष्णता संतुलनाची व्यवस्था अपयशी ठरते. वातावरणातील जास्त तापमान किंवा खूप वेळा उन्हामध्ये खूप शारिरीक कष्ट असलेले काम करणे किंवा अति व्यायाम करणे तसेच पाणी, क्षार किंवा इतर तरल पदार्थ कमी प्रमाणात सेवन केल्याने ही परिस्थिती उद्भवते.
लक्षणे
अचानक चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, दरदरून घाम फुटणे, थकवा येणे आदी.
काय काळजी घ्याल ?
तापमान वाढत असल्याने शक्यतो दुपारच्या वेळी बाहेर पडू नये.
शरीरातील पाणी कमी होणार नाही, याची काळजी घ्यावी.
थंड पेय, लिंबू सरबत, वाळा सरबत घ्यायला हवे.
कामानिमित्त दुपारी बाहेर जात असाल तर सोबत पाण्याची बाटली, टोपी, स्कार्फ, सनग्लास ठेवावे.