महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १२ एप्रिल । भाजचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी आंदोलनातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं योगदान नाकारलं आहे. बाबरी आंदोलनात शिवसेनेचा एकही नेता नव्हता. बाबरी पाडण्याचं सर्व श्रेय हे विश्व हिंदू परिषदेलाच जातं, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावर संताप व्यक्त केला आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा मागितला आहे. दुसरीकडे भाजपचे नेते अमित शाह यांनीही चंद्रकांत पाटील यांच्या विधानाची गंभीर दखल घेतली आहे. तसेच भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांना वादग्रस्त विधान न करण्याचे आदेशच दिले आहेत.
भाजपचे आमदार आशिष शेलार काल दिल्लीत होते. शेलार यांनी काल अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. राज्यातील राजकीय समीकरणं, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट तसेच चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरही चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीची तयारी आणि रणनीती यावरही या नेत्यांसोबत शेलार यांनी चर्चा केली. त्यावेळी अमित शाह यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
विकासावरच बोला
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशी विधाने खपवून घेणार नाही. महाराष्ट्रातील नेत्यांनी वादग्रस्त विधाने करू नये. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून वारंवार वादग्रस्त विधाने केली जात आहेत. ते योग्य नाही. याला आवर घाला. केंद्र आणि राज्य सरकार चांगलं काम करत आहे. दोन्ही सरकारच्या विकासकामांवरच बोला, अशी ताकीदच शाह यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.