महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ एप्रिल । राज्याच्या सत्तासंघर्षावर लवकर निकाल येणार असल्याची शक्यता आहे. 14 मे आधी निकाल येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालाकडे राज्यच नव्हे तर अवघ्या देशाचे लक्ष लागलं आहे. 16 मार्च रोजी सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठाने आपला निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे हा निकाल कधी लागणार, याकडे आता सर्वांच्या नजरा वळल्या आहेत.
आतापर्यंतचा इतिहास पाहता एखाद्या मोठ्या प्रकरणाचा निकाल राखून ठेवल्यानंतर साधारण महिनाभरात न्यायालयाकडून त्याचा निकाल जाहीर केला जातो. सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवला आहे, त्याला येत्या 16 एप्रिल रोजी एक महिना पूर्ण होईल. त्यामुळे लवकरच हा निकाल लागण्याची शक्यता आहे. असं असले तरी महिनाभरात निकाल देण्याचे सर्वोच्च न्यायालयाला कोणतेही बंधन नाही, हे लक्षात घेणेही महत्त्वाचे आहे.
राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे झाली. त्यातील एक न्यायमूर्ती एम. आर. शाह हे 15 मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे 14 मेच्या आधी हा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालय एखाद्या प्रकरणाचा निकाल देणार, हे आदल्या दिवशीच जाहीर केले जाते. न्यायालयाच्या कामकाजाच्या यादीत एक दिवस आधी निकालाची ही तारीख येते. त्यामुळे राज्याच्या सत्तासंघर्ष प्रकरणाचा निकाल लागेल तेव्हा एक दिवस आधीच त्याची तारीख जाहीर होईल. ही तारीख नेमकी काय असणार? याची उत्सुकता आहे.
दुसरीकडे, 20 मे पासून सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळी सुट्ट्याही सुरु होत आहेत. 20 मे ते 2 जुलै अशी सुप्रीम कोर्टाची सुट्टी असणार आहे. त्यामुळे एप्रिल शेवटचा आठवडा किंवा मे च्या पहिल्या आठवड्यापर्यंत कधीही निकालाची शक्यता आहे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सत्तासंघर्षाच्या या निकालावरच महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.