Gas Cylinder : हॉटेल व्यावसायिकांना सिलिंडर दरवाढीची झळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ एप्रिल । गॅस सिलिंडर दरवाढीचा फटका केवळ घरगुती वापरकर्त्यांपर्यंत मर्यादित राहिला नसून, व्यावसायिक वापरासाठी सिलिंडर घेणाऱ्यांनादेखील झळ सोसावी लागत आहे. व्यावसायिकांच्या बाबतीत मात्र थोडी खुशी, बहुत गम अशी परिस्थिती आहे. कारण मार्च २०२२ पासून एप्रिल २०२३ पर्यंत व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महागला आहे.

गेल्या वर्षी मेमध्ये १९ किलोच्या सिलिंडरचे दर २३६४ रुपये झाले होते. त्यानंतर दर कमी होत तो फेब्रुवारी २०२३ मध्ये १७७८ रुपये झाला. मात्र मार्चमध्ये दरवाढ झाल्याने सिलिंडर आता २१२८ रुपयांना झाला आहे. सुरुवातीला स्थिर दर, त्यानंतर झालेली दरवाढ. किंमत कमी झाल्यानंतर मिळालेला दिलासा आणि पुन्हा मार्चमध्ये झालेली दरवाढ यामुळे व्यावसायिक सिलिंडर वापरकर्त्यांना गेल्या वर्षात सुखद आणि दुःखद धक्के मिळाले आहेत.

मात्र वर्षभरात सिलिंडर ११४ रुपयांनी महागल्याचे व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे. तसेच इतर वस्तूंचे भाव देखील तेजीत असल्याने या व्यवसायिकांना दुहेरी फटका सहन करावा लागत आहे. व्यावसायिक सिलिंडर महागल्याचा सर्वाधिक फटका हॉटेल क्षेत्राला बसत आहे. तसेच ज्या ठिकाणी विविध कामांसाठी गॅस वापरला जातो ती क्षेत्रे देखील प्रभावित झाली आहेत. त्यामुळे दर कमी करण्याबाबत सरकारने लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *