महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १४ एप्रिल । जगात सर्वाधिक उष्ण शहर असलेल्या चंद्रपूरचे तापमान सलग तिसऱ्या दिवशी, गुरुवारी ४३.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. आजचे तापमान जगात व देशात सर्वाधिक आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांना उन्हाच्या झळा सोसवेनाशा झाल्या आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून चंद्रपुरातील तापमानात वाढ होऊ लागली आहे.
११ एप्रिल रोजी चंद्रपूरचे तापमान ४१ अंश सेल्सिअस होते, तर १२ एप्रिल, बुधवारी ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बुधवारचे तापमान राज्यात सर्वाधिक होते. आज, गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी तापमानात मोठी वाढ झाली. आजचे तापमान ४३.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. चंद्रपूरपाठोपाठ जगात सेनेगलच्या कोलडा येथील तापमान ४३ अंश सेल्सिअस तर भारतातील करनूल येथील तापमान ४२.५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. त्यामुळे येत्या काही दिवसात चंद्रपूरच्या तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.