विलासराव देशमुख यांना होतं सूनेचं कौतुक, रितेश देशमुखने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाला, “आज ते असते तर…”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १४ एप्रिल । रितेश देशमुख व जिनिलिया देशमुख यांच्याकडे एक आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. दोघांनीही आपल्या अभिनयाच्या जोरावर कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. ‘तुझे मेरी कसम’ हा या दोघांचा पहिला एकत्रित चित्रपट. या चित्रपटादरम्यानच रितेश व जिनिलियाच्या नात्यामध्ये जवळीक निर्माण झाली होती. शिवाय हा चित्रपट खुद्द विलासराव देशमुख यांनीही पाहिला होता.

जिनिलिया व विलासराव देशमुख यांच्यामध्ये अगदी चांगलं नातं होतं. बऱ्याच मुलाखतींमध्ये जिनिलिया विलासराव यांच्याबाबत भरभरुन बोलताना दिसली. तसेच वडिलांप्रमाणेच विलासराव देशमुख माझ्यासाठी होते असं जिनिलियाचं म्हणणं आहे. तर रितेशने वडील जिनियालाच्या कामाचं कशाप्रकारे कौतुक करायचे याबाबत एक किस्सा सांगितला आहे.


‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये “‘तुझे मेरी कसम’ चित्रपट पाहिल्यानंतर “जिनिलियाचा अभिनय तुझ्यापेक्षा चांगला आहे” असं विलासराव देशमुख म्हणाले होते हे खरं आहे का?”. असा प्रश्न रितेशला विचारण्यात आला. यावेळी तो म्हणाला, “हो. बरोबर आहे. ते असंच म्हणाले होते. माझे वडील खूश होतील आणि मला बोलतील की, तू मस्तच काम केलं. मला शाबासकी देतील असं मला वाटलं होतं. पण ते म्हणाले, तुझ्यापेक्षा जिनिलियाने उत्तम काम केलं आहे”.

“२०१२मध्ये जिनिलीयाचा व माझा ‘तेरे नाल लव्ह हो गया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यांनी आमच्या दोघांचा हादेखील चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी म्हटलेलं वाक्य आजही मला आठवत आहे. ते म्हणाले होते की, “ती (जिनिलिया) अजुनही तुझ्यापेक्षा उत्तम काम करते. ते आताही असते आणि त्यांनी जर ‘वेड’ चित्रपट पाहिला असता तर ते म्हणाले असते, आजही जिनिलिया तुझ्यापेक्षा चांगलंच काम करते”. जिनिलियाचं विलासराव देशमुख भरभरुन कौतुक करायचे हे रितेशच्या बोलण्यामधून दिसून आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *