महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १५ एप्रिल । जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात 8 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, 25 जण जखमी झाले आहेत.
चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले
बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या खासगी बसमध्ये 40 प्रवासी होते. 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 25 प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमी प्रवाशांना दरीत कोसळेल्या बसमधून बाहेर काढण्यात आले आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. उर्वरित प्रवाशांना बाहेर काढण्यात येत आहे. पहाटे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्रीच पुण्याहून ही बस मुंबईला निघाली होती.
युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने बचावकार्य हाती घेतले आहे. आतापर्यंत 16 जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. या जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, आणखी प्रवासी बसमध्ये अडकल्याची माहिती मिळत आहेत. बचावपथकांकडून त्यांना बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.
मुंबईतील वादक पथकावर काळाचा घाला
रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी माध्यमांना सांगितले की, खाजगी बसमध्ये मुंबईतील गोरेगावमधील बाजी प्रभु वादक गट (झांज पथक) होते. ते सर्वजण पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगाव येथे जात होते. यावेळी ही दुर्घटना घडली. बसमध्ये आणखी काही प्रवासी अडकल्याची भीती आहे. दरीत कोसळलेल्या बसमधून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांच्या मदतीला स्थानिक हायकर्स ग्रुप आणि आयआरबी टीम दाखल झाली आहे.