महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १५ एप्रिल । तुम्हाला जादूची कांडी मिळाली तर जगातील कोणता एक बदल करू इच्छिणार व का? शहरातील प्रत्येक कार पांढऱ्या रंगाच्या असत्या तर काय झाले असते…? अशा प्रकारचे प्रश्न नव्या सत्रात तिसरी ते आठवीपर्यंतच्या मुलांना होमवर्कमध्ये विचारले जातील. नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत मुलांमध्ये कल्पनाशक्ती व सर्जनशीलता वाढवण्याच्या उद्देशाने असा प्रयोग सरकारी शाळांमध्ये केला जात आहे. याचा फॉरमॅटही जारी केला आहे.
नव्या सत्रासाठी तयार करण्यात आलेल्या उपक्रमात मुलांनी खेळता-खेळता वाचावे व शिकावे तसेच त्यांच्यात सल्ला देण्याची प्रवृत्ती वाढावी याकडे लक्ष दिले आहे. यामुळे ते सर्जनशील विचारांकडे वळतील. गणित सोपे बनवण्यासाठी गणितीय आकडेमोडही खेळता-खेळता शिकवण्याचा प्रयत्न केला जाईल. कवितेच्या माध्यमातून मौखिक गणित शिकवले जाईल. यात रंजक प्रश्नांचाही समावेश असेल. त्यांची उत्तरे कोणत्याच पुस्तकात सापडणार नाहीत. मुले कल्पनाशक्तीच्या आधारे या प्रश्नांची उत्तरे देतील. अशा प्रश्नांशी संबंधित नमुनेही जारी केले आहेत. त्याआधारे शाळा व्यवस्थापन आपल्या पातळीवर प्रश्न तयार करून घेऊ शकते.
लोकशिक्षण विभागाचे संयुक्त संचालक (ग्वाल्हेर-चंबळ विभाग) दीपक पांडे म्हणाले,‘शालेय उपक्रमांशी संबंधित असा फॉरमॅट प्रथमच आला आहे. याचा उद्देश मुलांची कल्पनाशक्ती वाढवणे आहे.’
असे प्रश्नही :
– २४ तास न झोपता, न थांबता एकच काम करायचे झाल्यास तुम्ही काय कराल?
– आयुष्यभर केवळ गोड खाणे किंवा पेय पदार्थांचे सेवन करायचे असेल तर तुमचे मत काय व का?
– शिकण्यासाठी अनेक वर्षे लागतात अशी कोणती गोष्ट शिकायची व ती कोणती असेल?
– तुम्हाला सुपर पाॅवर निवडण्याचा पर्याय मिळाला तर काय घेणे पसंत कराल आणि का?
वृत्तपत्रांतील बातम्यांमधून वस्तुस्थिती समजावून सांगणार, भाषा समृद्ध करणार
शालेय उपक्रमांमध्ये वृत्तपत्र व बातम्यांच्या स्रोतांच्या मदतीने मुलांचे ज्ञान वाढेल. बातम्यांच्या माध्यमातून वस्तुस्थिती सांगणार. यामुळे भाषा सुधारण्यासही मदत मिळेल. याशिवाय सकारात्मक बातम्यांद्वारे सकारात्मक घटनेची सुरुवात कशी झाली, कोणाचा यात समावेश आहे, त्यांना काय अडचणी आल्या व त्यांनी उपाय कसा शोधला हे सांगणार. तसेच कोणत्या प्रयत्नांद्वारे हे सकारात्मक काम झाले व अशा घटना आयुष्यावर काय परिणाम करतात हेही सांगणार.