![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६ एप्रिल । शनिवारी राज्याच्या काही भागांत दमदार पावसानं हजेरी लावली. अर्थात वीजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट असला तरीही हा पाऊस अवकाळीचा असल्यांमुळं त्यानं अनेकांच्या अडचणीत भर घातली. पुण्याला याचा सर्वाधिक फटका बसला असून, काही भागांत रस्त्यांवर पाणीही साचल्याचं पाहायला मिळालं. भारतीय हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पुणे आणि लगतच्या भागाला सध्या Yellow Alert देण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांसाठी पुण्यात सकाळ आणि दुपारच्या वेळी तापमान सर्वसामान्य पातळीत राहणार असून, मावळतीच्या वेळी पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळू शकतो.
दरम्यान उन्हाचा तडाखा आणि मध्येच अचानकच कोसळणाऱ्या पाऊसधारा पाहता नागरिकांनी सकाळी 11 ते दुपारी 2.30 वाजण्याच्या दरम्यान घराबाहेर न पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरलाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुढच्या दोन दिवसांसाठी राज्यात यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आल्यामुळं काही भागांन पावसाचा तर, काही भागांना मात्र कडक उन्हाचा तडाखा बसणार आहे. यामध्ये चंद्रपुरात तापमान 43 अंशांच्याही पलीकडे जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
देशातील हवामानची काय परिस्थिती?
महाराष्ट्रात पावसाची हजेरी असतानाच देशात पुढील 5 दिवस बहुतांश भागांना पावसाचा तडाखा बसणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. हिमाचल प्रदेश आणि नजीकचा भाग यामध्ये सर्वाधिक प्रभावित असेल. येत्या 24 तासांच हिमाचलच्या काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसतील. तर, मैदानी भागांमध्ये ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पर्जन्यमानाचा अंदाज आहे. पर्वतीय भागांमध्ये 17 ते 18 एप्रिललदरम्यानही असंच काहीसं चित्र पाहायला मिळू शकतं
दरम्यान, पुढील 24 तासांत देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये तापमानात फारसे बदल नसलीत असं सांगण्यात आलं आहे. एकिकडे पाऊस आणि दुसरीकडे असणाऱ्या उन्हाळी वातावरणाचे थेट परिणाम शेतात उभ्या असणाऱ्या पिकांवर होताना दिसणार आहेत.तिथं राजस्थानच्या नेऋत्य भागावर चक्राकार वाऱ्याची परिस्थिती तयार झाली आहे. तर, आंध्र प्रदेश, ओडिशा, झारखंड आणि तामिळनाडूपर्यंत 900 मीटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याची माहिती हवामान विभागाकडून मिळत आहे. ज्यामुळं या भागांतही पाऊस हजेरी लावणार आहे.