महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १७ एप्रिल । ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने आज ( १६ एप्रिल ) गौरवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारमधील मंत्री उपस्थित होते. नवी मुंबईमध्ये या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी आले होते. पण, आज ४२ अंश सेल्सियस तापमान असल्याने पुरस्कार सोहळ्यात आलेल्या अनेक अनुयायांना उष्माघाताची समस्या जाणवली. काहीजण चक्कर येऊन पडले, तर अनेकांना उलटी झाली. त्यामुळे अनुयायांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यातील ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
#WATCH| Maharashtra: People being taken to Tata Hospital in Kharghar after they suffered from heatstroke during Maharashtra Bhushan Award ceremony pic.twitter.com/HWw0w5J5bh
— ANI (@ANI) April 16, 2023
रुग्णालयात दाखल असलेल्या अनुयायांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेत चौकशी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “५० लोकांना उष्माघाताची समस्या जाणावली होती. त्यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २४ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत सरकारतर्फे केली जाणार आहे. उपचारधीन असलेल्या अनुयायांचा खर्च सरकार करणार आहे,” अशी माहितीही एकनाथ शिंदेंनी दिली.
यावरून काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी राज्य सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अतुल लोंढे ट्विट करत म्हणाले, “महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा कार्यक्रमान भर दुपारी उन्हात ठेवण्यात आला होता. या सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप दहा लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक गंभीर आहेत. हा सरकारने केलेला मनुष्यवध आहे. यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे,” असं लोंढेंनी म्हटलं आहे.