महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १७ एप्रिल । श्री साईबाबांमुुळे जगविख्यात असलेले शिर्डी देवस्थान आता श्री सरस्वतीच्या मंदिराच्या माध्यमतून जगाला वेगळी ओळख दाखवण्यासाठी सज्ज झाले आहे. साई संस्थानने १४ एकरवर तब्बल २९८ कोटी खर्चून देशातील नामवंत खासगी शाळांच्या तोडीस तोड आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक संकुल उभारले आहे. येथे केजीपासून पीजीपर्यंत ग्रामीण भागांत राहणाऱ्या ११ हजार विद्यार्थ्यांना एकाच छताखाली शिक्षण घेता येईल. डिजिटल क्लासरूम, अत्याधुनिक प्रयोगशाळा, आर्टरूम, प्रशस्त वाचनालय, भोजन कक्ष, १०५० क्षमतेचे वातानुकूलित ऑडिटोरियम, क्रीडा संकुल, ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव, जिम, बँडमिंटन, टेबल टेनिस कक्ष अशा सुविधा यात असतील. मुलींसाठी मराठी माध्यमाची स्वतंत्र कन्या शाळा असून तेथे मोफत शिक्षण राहील. इंग्रजी माध्यमाच्या शाळांत इतरत्र पहिलीलाच ५० हजार ते लाखभर रुपये फी घेतली जाते. येथे नाममात्र साडेचार हजार रुपयांत विद्यार्थ्यांना सर्व सुविधा मिळतील. विद्यार्थ्यासाठी बसची व्यवस्था असून मुलींसाठी ती मोफत असेल. रोज मोफत भोजनही असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ ऑक्टोबर २०१८ रोजी या संकुलाची पायाभरणी केली होता. त्यानंतर अवघ्या ५ वर्षात ते पूर्णत्वास आले असून आता पंतप्रधानांच्या हस्तेच एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अथवा मेच्या प्रारंभी या शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन करण्यात येईल. शिर्डीचे आमदार आणी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत सुतोवाच केले.
शैक्षणिक शुल्क अत्यंत कमी : इयत्ता दहावीसाठी ७ हजार रुपये, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांतही मोजकी फीस सध्या संकुलात ५,४५० विद्यार्थी असून त्यात दुपटीने वाढ होईल. इंग्रजी शाळेत २५०० वरून ४०००, स्वतंत्र कन्या शाळेत ८०० वरून ३५००, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय क्षमता २१०० वरून ३५०० वर जाईल. दहावीला केवळ ७ हजार फी आहे. कनिष्ठ महाविद्यालयात मुलींना मोफत, मुलांसाठी ३३०, तर वरिष्ठ महाविद्यालयात ३ हजार रुपये फी.
डिजिटल शिक्षण : ७४ कोटी खर्च डिजिटल क्लासरूमसाठी ७४ कोटी खर्च करण्यात आला आहे. सीसीटीव्ही, लँडस्केपिंग, सोलार सिस्टिम, वातानुकूलित यंत्रणा, जॉगिंग ट्रँक, पार्किंग, लिफ्ट व व्हीआयपींसाठी ग्रीन रूम असेल.
परिसर व गुणवत्तेवर प्रवेश जवळच्या परिसरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेवरच प्रवेश दिला जाईल.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा ^इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादच्या धर्तीवर शिर्डीतील १४ एकरांवर उभ्या शैक्षणिक संकुलाची रचना आहे. संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या बौद्धिक कक्षा विस्तारण्यास मदत होईल.’ डॉ. सुरेश हावरे, माजी अध्यक्ष ,साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी
संकुल मोलाचे ठरेल ^साईबाबा संस्थानच्या नवीन शैक्षणिक संकुलाचे काम पूर्णत्वास गेले आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हे शैक्षणिक संकुल शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावेल.’ राहुल जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी