महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १८ एप्रिल । बॉलिवूडमधील नकारात्मक व खलनायकांच्या भूमिकेतून लोकप्रियता मिळवणाऱ्या काही अभिनेत्यांपैकी एक म्हणजे दिवंगत अमरीश पुरी होय. त्यांच्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांना आठवतात. ते या जगात नसले तरी चित्रपट व त्यातील त्यांच्या भूमिकांमधून ते आजही जीवंत आहेत. आता अमरीश पुरी यांच्याबद्दल बोलायचं कारण म्हणजे त्यांचा व्हायरल होणारा एक व्हिडीओ आहे.
अमरीश पुरी सध्या तुरुंगात असलेल्या आसाराम बापूचे अनुयायी होते. एकदा ते आसाराम बापूंचे प्रवचन ऐकण्यासाठी आले होते, तेव्हा आसाराम बापूंचे प्रवचन ऐकून मनाला शांती मिळते, असे त्यांनी स्वत: सांगितले होते. याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आसाराम बापू अमरीश पुरी यांना स्वतःची ओळख करून देण्यास आणि दोन शब्द बोलण्यास सांगत आहे.
अमरीश पुरी बोलायला सुरुवात करतात. “बंधू आणि भगिनींनो, मी देवाचा भक्त आहे, बापूजींचा भक्त आहे, त्यांचे प्रवचन ऐकून मनाची शुद्धी होते, म्हणूनच आपण सगळे इथे जमतो. आम्हाला येथे ज्ञान आणि प्रवचन मिळत राहते. बापूजी आम्हांला सदैव आशीर्वाद देत राहोत आणि आम्हाला जागृत करत राहोत,” असं ते म्हणतात. ‘लाफिंग मूमेंट्स’ नावाच्या एका चॅनेलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.