महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १८ एप्रिल । राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. अशातच आता अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. राज्यातील राजकीय घडामोडीवर आमदार रवी राणांचा मोठा दावा केला आहे. अजित पवार हे शरद पवार यांच्याच परवानगीने भाजपमध्ये येणार असल्याचं रवी राणा म्हणाले आहेत. जेव्हा पंतप्रधान मोदी आणि अमित शाह हिरवा कंदील देतील. तेव्हा अजित पवार भाजपसोबत येतील. हिरवा कंदील केव्हाही येऊ शकतो. तेव्हा अजित पवार नॉट रिचेबल होतील, असं रवी राणा म्हणाले आहेत. अजित पवार यांचा श्वास 33 महिन्याच्या मविआ सरकार सोबत गुदमरलेला आहे. शरद पवारसाहेबांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध काय आहेत, हे संपूर्ण देशाला माहिती आहेत.उद्धव ठाकरेंसोबत सरकार स्थापन झाल्यानंतर अजित पवार यांनी मन लावून काम केलं नाही. कारण ते सरकार कामच करत नव्हतं, असंही रवी राणा म्हणाले आहेत.