महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १८ एप्रिल । राज्यात सोमवारी दहा शहरांतील तापमान चाळिशीपार गेले. चंद्रपूर येथे सर्वाधिक ४३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. नाशकातही दोन दिवसांपेक्षा तापमान १ अंश सेल्सियसने वाढून ते ३९.२ अंशावर गेले होते. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातही तापमान वाढले होते. दरम्यान, येत्या रविवार, २३ एप्रिलपर्यंत राज्यात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
निवडक शहरांतील तापमान
चंद्रपूर ४३.२, अकोला ४२.८, वर्धा ४२.५, जळगाव ४२.४, परभणी ४१.९, धुळे ४१.०, नागपूर ४०.९, मालेगाव ४०.८, सोलापूर ४०.८, बीड ४०.६, नांदेड ३९.८, नाशिक ३९.२, छत्रपती संभाजीनगर ३९.२, धाराशिव ३९.०, बुलडाणा ३९.०, अहमदनगर ३८.४.
पाऊस व सोबत ऊनही
आज (ता. १८) उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या कमाल तापमानातही 2 ते 3 अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात सध्या कमाल तापमानात वाढ होत असून, उन्हाच्या झळा असह्य ठरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
पावसाला पोषक हवामान
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. कर्नाटक पासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे आज उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
अवकाळीचा तडाखा सुरूच
काल संध्याकाळी अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत गारांसह पाऊस कोसळला. नगर शहरासह जिल्ह्याला गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, त्याचबरोबर इतर पिकांचे नुकसान झाले. अकोले तालुक्यातील काही भागातही पावसाने हजेरी लावली.