महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १८ एप्रिल । राज्याच्या राजकारणात सुरु असणाऱ्या घडामोडींना प्रचंड वेग आला असून, आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक मोठा निर्णय घेतल्याचं समजत आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या सोशल मीजियाच्या माध्यमातून राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय सुरुये याचा अंदाज बांधला जात होता. पण, आता मात्र याच सोशल मीडिया अकाऊंटवरून वेगळ्याच घडामोडी समोर येत आहेत.
अजित पवार यांनी सोशल मीडियावरील राष्ट्रवादी कॉंग्रेस, घडयाळ चिन्ह आणि शरद पवार यांच्यासह स्वतःचा फोटो असलेलं वॉलपेपर डिलीट केलं आहे. मंगळवार सकाळपासूनच त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले वॉलपेपर डिलीट करण्यात आले आहेत. अजित पवार यांच्या ट्विटर आणि फेसबुकवर वॉलपेपर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार यांचा फोटो होता. पण, आता मात्र ते फोटो कायमस्वरूपी डिलीट करण्यात आले आहेत.
शरद पवार यांची काय प्रतिक्रिया?
इथे अजित पवार राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच तिथे शरद पवार यांनी मात्र या चर्चा असत्य असल्याची प्रतिक्रिया देत ते पक्षाचं काम करत असल्याचं स्पष्ट केलं. सासवड येथे माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी अजित पवार आणि पक्षातील घडामोडींवर भाष्य केलं.
माध्यमांमध्ये सुरु असणाऱ्या वृत्तांचा संदर्भ देत ‘जी चर्चा तुमच्या मनात आहे ती आमच्या कुणाच्याच मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्त्वं नाही’, असं ते म्हणाले. सध्या पक्षातील सदस्य पक्ष अधिक शक्तिशाली कसा होईल याचाच विचार करत असल्याचंही ते म्हणाले.