महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २० एप्रिल । राज्याच्या राजकारणात येत्या 15 दिवसांत २ मोठे बॉम्बस्फोट होतील असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. यानंतर अजित पवार भाजपात प्रवेश करणार या चर्चांवर त्यांनी हे विधान केलं होतं. मात्र अजित पवारांनी मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचा खुलासा केला आणि सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानंतर पुन्हा पत्रकारांनी प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारला त्यावर मी अजूनही माझ्या विधानावर ठाम असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मोठा भूकंप ज्यावेळी होतो तेव्हा त्याचे छोटे छोटे संकेत दिसायला लागतात. एक भूकंप होता होता थांबला असं त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. मी सध्या यावर भाष्य करणार नाही. माझे जे विधान आहे राज्यात २ भूकंप होतील त्यावर मी कायम आहे. सगळेच सांगितले तर उत्सुकता जाते. त्यामुळे मी सांगत नाही असं त्यांनी सांगितलं आहे.
कुणालाही अपात्र ठरवण्याचा अधिकार कोर्टाला नाही
सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तरी कोर्टाला कुणाला अपात्र करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे निकालातून अपात्र होईल असं वाटत नाही. अपात्रतेची जी कार्यवाही होती. विधानसभा उपाध्यक्षांच्या कारवाईवर स्थगिती होती ती उठवली जाईल असं वाटते असंही ते पुढे म्हणालेत.
तर राज्यपाल, विधिमंडळ यात कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही. राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयावर कोर्ट भाष्य करणार नाही. राज्यपालांचा निर्णय बदलला जाईल असं वाटत नाही कारण घटना होऊन गेली आहे. उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीआधीच राजीनामा दिला होता. राज्यपालांचे आदेश मागे घेण्याबाबत घटनात्मक बंधन आहेत. विधानसभा उपाध्यक्षांच्या कारवाईला स्थगिती दिली होती ते उठवला जाईल असा अंदाज प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.