महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २१ एप्रिल । दहशतवादी हल्ल्याने जम्मू-कश्मीर पुन्हा हादरले आहे. राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांना घेऊन जाणाऱया ट्रकवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. त्यामुळे ट्रकला भीषण आग लागली. त्यातील पाच जवान शहीद झाले, तर एक जवान जखमी झाला. पूंछ जिल्हय़ात भीमबर गली ते संगिओतकडे दुपारी तीनच्या सुमारास हल्ला झाला. दरम्यान, लष्कराने युद्धपातळीवर सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
सुरुवातीला लष्कराच्या वाहनावर वीज कोसळली, वाहनामध्ये रॉकेल असल्याने आग भडकल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता, मात्र सायंकाळी लष्कराच्या नॉदर्न कमांडने हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट केले. लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना हल्ल्याची माहिती दिली.