करोना काळातली डोलो आठवतेय का? गोळीमुळे कंपनीनं ४०० कोटी कमावले; आता मालकांनी धुरळा केलाय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २१ एप्रिल । करोना काळात एका गोळीचं नाव सगळ्यांच्या तोंडावर होतं. ताप, सर्दी, खोकला, खवखवणारा घसा यावर सगळे जण एकच गोळी सांगायचे. करोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर बऱ्याच जणांना ताप आला. त्यावरही एकच गोळी सांगितली गेली. ही गोळी म्हणजे डोलो. करोना संकटकाळात डोलोनं धुरळा केला. त्यामुळे डोलोची निर्मिती करणाऱ्या मायक्रो लॅब्सनं मोठी कमाई केली. आता डोलोचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप सुराना यांनी धुरळा उडवला आहे.

करोना काळात डोलो गोळीच्या विक्रीच्या माध्यमातून तब्बल ४०० कोटींची कमाई करणाऱ्या दिलीप सुराणा यांनी मालमत्ता क्षेत्रात खळबळ उडवून देणारा व्यवहार केला आहे. सुराणा यांनी बंगळुरूत तब्बल ६६ कोटी रुपयांची प्रॉपर्टी खरेदी केली आहे. बंगळुरूच्या रिअल इस्टेट क्षेत्रातला हा मोठा व्यवहार मानला जात आहे. सुराणा यांनी एकूण १२ हजार ४३ चौरस फुटांची जमीन खरेदी केली आहे. त्यातील ८ हजार ३७३ चौरस फुटांवर आलिशान बंगला आहे. जी. जी. राजेंद्र कुमार, साधना आणि मानू गौतम यांच्याकडून सुराणा यांनी ही मालमत्ता खरेदी केली आहे. त्यासाठी त्यांनी ३.३६ कोटी रुपये रक्कम स्टॅम्प ड्युटीवर मोजली आहे.

दिलीप सुराणा मायक्रो लॅब्सचे चेअरमन आहेत. ही कंपनी औषध निर्मिती क्षेत्रातील ख्यातनाम कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचा वार्षिक महसूल ४ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. कार्डिऍक डायबेटिस आणि पेन किलर्सची निर्मिती कंपनीकडून केली जाते. कंपनीच्या एकूण महसुलापैकी ६० टक्के महसूल भारतातून येतो.

२० वर्षांपूर्वी सुराणा कुटुंब बंगळुरूत भाड्याच्या घरात राहायचं. दिलीप सुराणा यांचे वडील जी. सी. सुराणा यांचा स्वभाव अतिशय काटकसरी होता. कंपनीच्या माध्यमातून मिळालेला प्रत्येक पैसा हा पुन्हा कंपनीतच गुंतवायला हवा, असं त्यांचं धोरण होतं. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी व्यवसाय वाढवण्यासाठी खर्च केलं. आलिशान घर आणि कार यामध्ये त्यांना अजिबात रस नव्हता.

जी. सी. सुराणा यांनी सुरू केलेली कंपनी आता दिलीप आणि आनंद सुराणा चालवतात. सध्याच्या घडीला मायक्रो लॅब्सचे एकूण १७ कारखाने आहेत. ५० देशांमध्ये कंपनीचा कारभार चालतो. डोलो-६५० गोळीमुळे मायक्रो लॅब्स प्रचंड चर्चेत होती. करोना महामारीच्या काळात एकट्या डोलो ६५० नं कंपनीला ४०० कोटी रुपये कमावून दिले. करोना संकट काळाआधी वर्षाकाठी डोलो-६५० च्या ७.५ स्ट्रिप्स विकल्या जायच्या. करोना महामारीच्या कालावधीत डोलोची विक्री दुप्पट झाली. मार्च २०१९ ते मार्च २०२१ या कालावधीत कंपनीचा नफा तब्बल २४४ टक्क्यांनी वाढला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *