महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २४ एप्रिल । पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी रिवा (मप्र) येथे पंचायतदिनी महिलांसाठी मोठी घोषणा करतील. वेगवेगळ्या ९ योजनांचे एकत्रीकरण करण्याची ही पहिली वेळ असेल. या योजनांचा देशातील सुमारे १० कोटी महिलांना थेट लाभ होणार आहे. एकूण ५.५ कोटी महिलांना विम्याचे कवच मिळेल. त्यात २.५ कोटी स्वयंसहायता गटाच्या सदस्य आहेत, तर तीन कोटी महिलांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विम्याच्या कक्षेत आणले जाईल.
घोषणेनंतर देशातील ५०० जिल्ह्यांतील २ कोटी महिलांना आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यांना बचत, बँकिंग, विमा सखी केले जाईल. त्या इतर महिलांना सुरक्षा विमा योजना, बँक खाते सुरू करणे, बचतीसारख्या योजनांबद्दल जागरूक करतील. देशभरात १० लाख कर्करोग स्क्रीनिंग शिबिरांचे आयोजन केले जाईल. त्यात २.५ कोटी महिलांचे स्क्रीनिंग होईल. त्यांच्यावर उपचारही आयुष्मान योजनेअंतर्गत होईल. केंद्र सरकार तीन महिन्यांत देशातील ५० हजार ग्रामपंचायतींमध्ये डिजिटल देवाण-घेवाणीच्या योजनेवर काम करेल. सरपंच किंवा इतर प्रतिनिधी महिला असलेल्या पंचायतींना प्राधान्य असेल.
पीडित महिलांची आकडेवारी ऑगस्ट २०२३ पर्यंत करणार जाहीर
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या संयुक्त सचिव स्मृती शर्मा म्हणाल्या, महिलांना केवळ विमा योजनेशीच जोडले जात आहे असे नव्हे, तर त्यांचे बँक खाते सुरू करून बचत करण्याचेही शिकवले जात आहे. त्यामुळे त्या आत्मनिर्भर होऊ शकतील. उपचारासाठी मदत होईल. सध्या कोणत्या राज्यांत ब्रेस्ट किंवा सर्व्हायकल कॅन्सरने पीडित किती महिला आहेत हे सांगणे कठीण आहे. ऑगस्ट २०२३ नंतर आकडे समोर येतील.