ज्वारी अन् बाजरीची भाकरी महागणार ? चारा पिकांकडे बळीराजाची पाठ

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २४ एप्रिल । राज्यात उन्हाळी हंगामातील ज्वारी, बाजरी पिकांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. सध्या राज्यात अवघ्या ३६ हजार ८५ हेक्टर क्षेत्रावरच उन्हाळी ज्वारी आणि बाजरीची पेरणी झाली आहे. परिणामी उत्पादन घटून ज्वारी, बाजरीची भाकरी महागण्याची शक्यता आहे.

काही दशकांपूर्वी रब्बीसह उन्हाळी ज्वारी, बाजरीची पिके शेतकरी घेत असत त्यामुळे शेतकऱ्यांना धान्यासोबतच गुरांसाठी वैरणही उपलब्ध होत होती. सिंचनाची सोय असणारे शेतकरी उन्हाळ्यात भाजीपाला किंवा इतर नगदी पिकांकडे वळल्याने अलिकडे चारा पिकांकडे पाठ फिरवली जात आहेत. त्यामुळे ज्वारी, बाजरीच्या क्षेत्रात घट होऊन उत्पादन कमी होत आहे. परिणामी दोन्ही धान्यांचे भाव वाढत आहेत.

विभागनिहाय अशी
आहे स्थिती (हेक्टरमध्ये)
विभाग ज्वारी बाजरी
अमरावती ३३११ १५४
नाशिक १९३ ११३५१
पुणे ०० ५७१२
कोल्हापूर ०० ९८१
औरंगाबाद ५९ ९६९३
लातूर ३६०५ ७१८
नागपूर ३०३ ०७

बाजरी २८ हजार हेक्टर क्षेत्रावर
राज्यात उन्हाळी बाजरीची लागवड २८ हजार ६१५ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे. त्यामध्ये नागपूर विभागातील शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी बाजरी पिकाकडे दुर्लक्ष केले आहे.

उन्हाळी ज्वारीचा ६० टक्केच पेरा
राज्यातील उन्हाळी ज्वारीचे सरासरी क्षेत्र १२ हजार ५२३ हेक्टर आहे. त्यापैकी अवघ्या ६० टक्केच क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. राज्यात ७ हजार ४७० हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी ज्वारीची पेरणी आहे.

गव्हापेक्षा ज्वारी, बाजरीला भाव
शेतकऱ्यांकडील गहू बाजार समितीमध्ये दोन ते अडीच हजार रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. तर ज्वारीला ४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. बाजरीही २ हजार ५०० ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटल आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *