महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २४ एप्रिल । संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपला सत्तेसाठी त्यांची गरज होती, ती आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता त्यांची गरज नाही. माझ्या माहितीप्रमाणे पडद्यामागे मुख्यमंत्री बदण्याच्या हालचाली सुरू झाल्याचा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान संजय राऊत यांच्या वक्तव्यापूर्वी शरद पवार यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे. मविआ आज आहे, उद्या सांगता येत नाही. मात्र आमची एकत्र काम करण्याची तयारी आहे. जागावाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या या सूचक वक्तव्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच अजित पवार यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना मुख्यमंत्रीपदाबाबतची आपली इच्छा व्यक्त केली होती. 2024 ला नाही तर आताही मी मुख्यमंत्रीपदावर दावा करू शकतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवारांचं हे वक्तव्य, शरद पवार यांचं मविआबद्दलचं वक्तव्य आणि संजय राऊत यांचा गौप्यस्फोट यामुळे राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.