![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २४ एप्रिल । आवक जावक कमी झाल्याने घाऊक बाजारातील उलाढाल मंदावली असून, बहुतांशी जिनसांचे दर स्थिरावल्याचे आढळले. मागणी कमी असल्यामुळे गेल्या आठवड्यातही खाद्यतेलांच्या दरात डब्यामागे आणखी दहा ते वीस रुपयांनी घट झाली. मात्र, आवक कमी असून मागणी चांगली असल्यामुळे गुळाच्या दरात क्विंटलमागे आणखी शंभर रुपयांनी वाढ झाली. हरभरा डाळीच्या दरात 100 रुपयांनी घट झाली. येथील खाद्यतेल बाजारात ग्राहकांची वर्दळ कमी असून दर मंदीकडे झुकल्याचे चित्र आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात उठाव कमी असल्यामुळे सोयाबीन, पामोलिन तसेच सूर्यफूल तेलाचे दर मंदीतच असून, गेल्या आठवड्यातही दरात प्रती टनामागे आणखी 25 डॉलर्सनी घट झाल्याचे वृत्त आहे. मागणी कमी असल्यामुळे येथील घाऊक बाजारातही गेल्या आठवड्यातही सरकी, सूर्यफूल, पामोलिन तसेच सूर्यफूल तेलाचे दर 15 किलो/लिटरच्या डब्यामागे आणखी वीस रुपयांनी उतरल्याचे सांगण्यात आले. मात्र, मागणी चांगली असल्यामुळे वनस्पती तुपाच्या दरात 15 किलोच्या डब्यामागे वीस रुपयांनी वाढ झाली. शेंगदाणा तेल तसेच खोबरेल तेलाचे दर मात्र टिकून असल्याचे सांगण्यात आले.
मागणी वाढल्याने साखरही तेजीतच
उन्हाच्या वाढत्या कडाक्यामुळे शीतपेये, आईस्क्रीम उत्पादकांकडून साखरेस भरपूर मागणी आहे. तसेच रमझान ईद आणि अक्षयतृतीयेच्या सणामुळे साखरेस चांगला उठाव होता. यामुळे गेल्या आठवड्यातही साखरेचे दर तेजीतच होते. शनिवारी येथील घाऊक बाजारात साखरेचा प्रतिक्विंटलचा दर 3700 ते 3750 रु. होता. अक्षयतृतीया आणि रमझान या सणांमुळे गुळास मागणी चांगली होती. मात्र, कडाक्याच्या उन्हामुळे गुळाचे उत्पादन मंदावले आहे, यामुळे गुळाची दरवाढ सुरूच आहे. गेल्या आठवड्यात सर्व प्रकारच्या गुळाच्या दरात क्विंटलमागे आणखी शंभर रुपयांनी वाढ झाली.