महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २८ एप्रिल । सोन्याच्या घौडदौडीला अक्षय तृतीयेच्या अगोदरपासूनच ब्रेक लागला आहे. सोन्या-चांदीचे दर (Gold Silver Price ) उच्च पातळीवर असले तरी त्यात आठवड्यापासून कुठलीही मोठी वाढ झाली नाही. किंमतीत मोठा उलटफेर न झाल्याने ग्राहकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दिवाळीपासून सोने आणि चांदीत दरवाढ सुरु आहे. सोन्यात तर 11 हजारांची वाढ झाली असून चांदीने पण मोठा पल्ला गाठला आहे. येत्या काही दिवसात सोने मोठा विक्रम करणार असल्याचा दावा बाजारातील तज्ज्ञ करत आहे. पण सध्या तरी किंमती आटोक्यात आहेत.
आज काय भाव
गुडरिटर्न्सनुसार, 28 एप्रिल रोजी, सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 56,100 रुपये तर 24 कॅरेटचा भाव 61,190 रुपये प्रति तोळा आहे. सोन्याच्या भावात 10 रुपयांची घसरण झाली आहे. 19 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोने प्रति तोळा 56,200 रुपये होते. तर 24 कॅरेटचा भाव 61,310 रुपये प्रति तोळा आहे.
सोने सत्तर हजारी मनसबदार
सोने-चांदीने 5 एप्रिल रोजी रेकॉर्ड केला होता. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,090 रुपये तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत 61,180 रुपये होती. सोन्याला 70,000 टप्पा गाठायला आता फार वेळ लागणार नाही. तर चांदीने आज यु-टर्न घेतला असला तरी चांदी लवकरच 80,000 चा टप्पा गाठेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.