कोयत्यासाठी आता ‘आधारसक्ती’? गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘या’ शहरात मोठा निर्णय, असे असतील नियम…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २९ एप्रिल । शहरात भररस्त्यात होणाऱ्या सशस्त्र हल्ल्यांसह खून व खुनाचे प्रयत्न रोखण्यासाठी पोलिसांनी कोयता व त्या स्वरूपातले शस्त्र विक्री करणाऱ्यांना तंबी दिली आहे. आता कोणत्याही ग्राहकाला आधार क्रमांकाशिवाय कोयत्यासह धारदार वस्तूची विक्री करता येणार नाही. जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्यांनाही हे नियम बंधनकारक असल्याची कठोर भूमिका शहर आयुक्तालयाने घेतली आहे. पिंपरी-चिंचवडपाठोपाठ आता नाशिकमध्येही कोयत्यासाठी ‘आधारसक्ती’ झाल्याने सशस्त्र हल्ले नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.

शहरामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, जाणीवपूर्वक दुखापत, गंभीर दुखापतीचे गुन्हे वाढत आहेत. त्यामध्ये कोयत्यासह इतर शस्त्रांचा वापर होत असल्याचे आयुक्तालयाचे निरीक्षण आहे. बेजबाबदारपणे कोयता व धारदार वस्तू विक्री करणाऱ्यांमुळे समाजविघातक गुन्हेगारांचे फावत असल्याचे दिसते. त्यामुळे आता मनाई आदेशान्वये या वस्तू फक्त जीवनावश्यक कामांसाठी विक्री करता येतील. त्यासाठी ग्राहकांची माहिती नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासह अंमलबजावणी करण्यास टाळटाळ केल्यास अथवा उल्लंघन केल्यास संबंधितांवर शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल होणार आहेत.

आदेशात काय?

– कोणत्याही ठिकाणी कोणीही व्यक्ती कोयता व शस्त्र नियमांशिवाय विक्री करणार नाही.
– कृषी साहित्य, खाद्यपदार्थ व इतर जीवनावश्यक वस्तूंखेरीज कोयता व शस्त्र विक्री करता येणार नाही.
– शस्त्र विक्री करताना खरेदीदाराचे नाव, मोबाइल क्रमांक, पत्ता, आधार क्रमांक नोंद करणे आवश्यक
– जीवनावश्यक प्रयोजनाकरिता कोयता व शस्त्र विकणाऱ्यांनाही हे नियम बंधनकारक
– सार्वजनिक ठिकाणी, व्यापारी पेठ, चौकात, शाळा-कॉलेज आवारात कोणीही हत्यारे बाळगणार नाही

कोयत्यासह इतर हत्यारांबाबत कठोर कारवाई करीत आहोत. मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येईल. हद्दीत हत्यार विक्री करणाऱ्यांचा प्रभारी निरीक्षकांची पथके शोध घेतील. कारवाई अहवाल आयुक्तालयात सादर करतील.- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *