Weather Forecast | एप्रिलमधील उष्णतेच्या तीव्र लाटेनंतर मे मध्ये पारा घसरणार, हवामान विभागाचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २९ एप्रिल । एप्रिलमधील उष्णतेच्या तीव्र लाटेनंतर आता मे महिन्यात तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आहे. मे महिन्यात उष्णतेच्या लाटेची तीव्रता कमी राहील, असे भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे. तसेच मान्सूनच्या उत्तरार्धात एल निनोची स्थिती मध्यम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Weather Forecast)

“वायव्य आणि पूर्व भारतातील काही भाग वगळता देशातील बहुतांश भागात तापमान सामान्य ते सामान्यपेक्षा कमी राहण्याची अपेक्षा आहे.” असे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, पूर्व-मध्य, पूर्व, ईशान्य आणि द्वीपकल्पीय भारताच्या काही भागांमध्ये मे महिन्यात कमाल तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्याची अपेक्षा आहे. वायव्य आणि पश्चिम-मध्य भारतात तापमान सामान्य ते सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

मे महिन्यात बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि छत्तीसगडचा उत्तर भाग, मध्य प्रदेशचा पूर्व भाग, तेलंगणा आणि गुजरातच्या किनारी काही भागांमध्ये उष्णतेची लाट तीव्र असेल.

मे, जून आणि जुलैमध्ये एल निनो परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये एल निनोची तीव्रता वाढेल. त्यानंतर त्यात घट होईल, असे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले. पावसाळ्याच्या उत्तरार्धात एल निनोची परिस्थिती मध्यम राहण्याची शक्यता आहे. पण एल निनो परिस्थिती सामान्य परिस्थितीच्या पलीकडे जाणार नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. (Weather Forecast)

एल निनो ही एक हवामानाची अशी एक परिस्थिती आहे जी पूर्वेकडील उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरातील पृष्ठभागाच्या पाण्याच्या असामान्य तापमानवाढीशी संबंधित आहे. यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव जाणवणार असून, भारतात दुष्काळ पडण्याची शक्यता असल्याचे भाकीत आंतरराष्ट्रीय संस्थांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *