पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अतिशय अश्लाघ्य टीकाः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांची पोलिस आयुक्तांकडे मागणी

Spread the love

Loading

 

पिंपरी-चिंचवड ः

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अतिशय अश्लाघ्य भाषेत टीका केली. मोदी यांची तुलना त्यांनी विषारी सापाशी केली. मोदी विषारी सापासारखे आहेत, ते विषारी नाही, तसे तुम्हाला वाटत नसेल तर त्यांना स्पर्श करून बघा, त्यांना स्पर्श केला तर तुम्ही मरून जाल, असे अतिशय संतापजनक आक्षेपार्ह्य विधान खर्गे यांनी काढले. बोलताना जीभ घसरण्याची खरगे आणि कॉंग्रेस नेत्यांची ही पहिलीच वेळ नाही.

आतापर्यंत मोदींबाबत बोलताना सोनिया गांधींपासून राहुल गांधींपर्यंत सर्व कॉंग्रेस नेत्यांची जीभ आणि पातळी घसरली आहे. खर्गे खरं म्हणजे कॉंग्रेसमधील अन्य नेत्यांसारखे नाहीत, प्रगल्भ आणि संयमित राजकारणी अशी त्यांची प्रतिमा आहे. पण कॉंग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांनाही गांधी घराण्याचे वारे लागले, असे दिसते. ‘ढवळ्यासंग बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला’, अशी त्यांची स्थिती झाल्यासारखी दिसते आहे. त्यामुळे अशा बेताल वक्तव्य करणारे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे ईमेलद्वारे निवेदन देऊन केली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना ईमेल करण्यात आला आहे

सदर निवेदनात काळभोर यांनी म्हटले आहे की, राजकारणात काय बोलावे, यापेक्षा काय बोलू नये, हे ज्याला समजते, तो यशस्वी होतो, असे म्हणतात. पण कॉंग्रेसचे सर्वच नेते गेल्या काही वर्षांत बेताल वक्तव्य करून अपयशी ठरत आहेत. याचे कारण ते नको ते बोलण्यात पुढे आहेत. जिभेला हाड नसल्यासारखे कॉंग्रेस नेते आपली मुक्ताफळं उधळत असतात. बोलताना आपली जीभ घसरली, याची जाणीव झाल्यानंतर खर्गे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मला तसे बोलायचे नव्हते, माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला. असा ठरावीक साचेबद्ध खुलासा करत जर तरच्या भाषेत त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. भाजपा सापासारखा आहे, त्याची विचारधारा विषारी आहे, या विचारधारेचे समर्थन केले तर तुमचा मृत्यू निश्चित आहे, असे मला म्हणायचे होते. मोदींबाबत मी काहीही बोललो नाही, मी व्यक्तिगत टीका कधीच करत नाही, असे म्हणायलाही ते चुकले नाही. तोंडातून निघालेला शब्द आणि भात्यातून निघालेला बाण कधी परत घेता येत नाही, त्यामुळे नंतर तुम्ही कितीही पश्चातबुद्धीचे प्रदर्शन केले तरी तोपर्यंत तुमचे व्हायचे ते नुकसान होऊन गेलेले असते. त्यामुळे बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोला, असे नेहमीच म्हटले जाते.

खर्गे जे बोलले ती त्यांची भाषा नाही, गांधी घराण्याची भाषा ते बोलले. आपल्या मालकाबद्दलची कृतज्ञतेची भावना खर्गे यांनी व्यक्त केली, असे म्हटले तर ते चूक ठरू नये. खरगेंचे ते विधान एचएमव्ही मालिकेतील होते. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली असली तरी या अध्यक्षपदासाठी खरगे ही कॉंग्रेसच्या नेतृत्वाची पहिली पसंती नव्हती. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनाच कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्याची गांधी घराण्याची इच्छा होती. पण गहलोत यांनी अध्यक्ष होण्याचे नाकारले, त्यामुळे नाईलाजाने गांधी घराण्याला अध्यक्ष म्हणून खर्गेंची निवड करावी लागली.

कॉंग्रेसमध्ये गांधी घराण्याशी लाळघोटेपणा करण्याची कॉंग्रेसच्या नेत्यांची स्पर्धा सुरू असते, त्यात आता खर्गेंची भर पडली आहे. खरं म्हणजे खरगेंकडून अशी अपेक्षा कोणी केली नव्हती. खर्गे कॉंग्रेसचे अध्यक्षच नाही तर राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेही आहेत. लोकसभेतील कॉंग्रेस पक्षाचे गटनेतेपदही त्यांनी सांभाळले आहे. बोलताना खर्गे यांची चूक झाली, हे उघड आहे, त्यामुळे त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत बिनशर्त माफी मागायला हवी. माफी मागितल्याने माणूस लहान होत नाही, तर त्याचा मोठेपणा दिसून येतो, याचे भान खरगे यांनी ठेवायला पाहिजे. कॉंग्रेसच्या अन्य कोणत्याही नेत्याने मोदी यांच्याबद्दल अशी भाषा वापरली असती तर लोकांना आश्चर्य वाटले नसते. पण खरगे यांच्या तोंडून अशी भाषा आल्यामुळे लोकांना आश्चर्य वाटले.

कॉंग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी याआधी मोदी यांचा उल्लेख ‘मौत का सौदागर’ असा केला होता. त्यानंतर त्यांचे चिरंजीव राहुल गांधी यांनी मोदींबाबत ‘चौकीदार चोर है’ असे म्हटले होते. मोदी आडनावावरून केलेल्या टीकेमुळे राहुल गांधी यांना नुकतेच आपले लोकसभा सदस्यत्व गमवावे लागले आहे. परिणामी खासदार म्हणून दिल्लीच्या ल्युटियन्स झोनमध्ये मिळालेल्या बंगल्यावरही त्यांना पाणी सोडावे लागले. तरी पण राहुल गांधी असो की खर्गे यांना शहाणपण येत नाही, याचे आश्चर्य वाटते.

कॉंग्रेसच्या अन्य कोणकोणत्या नेत्याने मोदींबाबत कोणकोणते शब्द वापरले याची यादी केली तर ती खूप मोठी होईल. विरोधी पक्षाचे नेते म्हणून खडगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांचा हा अधिकार कोणी नाकारत नाही. मात्र विरोधी पक्षाचे नेते म्हणून आपण काहीही बोलावे, असंसदीय शब्दाचा आणि भाषेचा वापर करावा, हे मान्य करता येत नाही. टीका करतानाही व्यक्तिगत टीका टाळली पाहिजे, मुद्यांवर आधारित टीका केली पाहिजे, तर लोकही अशा विधायक टीकेचे स्वागत करतात. खर्गे आणि अन्य कॉंग्रेस नेत्यांनी आतापर्यंत वापरलेली भाषा ही उचलली जीभ लावली टाळूला या प्रकारची आहे.

सोनिया गांधींपासून अन्य कॉंग्रेस नेत्यांनी मोदींबाबत जी भाषा वापरली, त्यावरून त्यांचा मोदींना असलेला व्यक्तिगत विरोध, सूडाची भावना दिसून येते. एवढी टीका होत असतानाही मोदी यांनी त्याला उत्तर देण्याचा कधी प्रयत्न केला नाही. आपण बरे आणि आपले देशविकासाचे काम बरे या भूमिकेतून मोदी यांची वागणूक होती. त्यामुळे ‘हाथी चले बाजार तो कुत्ते भोके हजार’, या म्हणीचे यानिमित्ताने स्मरण होते. गांधी घराण्याने वा कॉंग्रेसच्या अन्य नेत्यांनी मोदींवर केलेल्या टीकेमुळे कॉंग्रेसचा फायदा होत असेल तर त्यांनी जरूर अशी टीका करायला हरकत नाही. पण आतापर्यंत जेव्हा जेव्हा कॉंग्रेसच्या नेतृत्वाने मोदींवर खालच्या भाषेत टीका केली, तेव्हा फायदा तर सोडाच पण कॉंग्रेसचे कधीही भरून न निघणारे नुकसानच झाले आहे, हा इतिहास आहे.

मोदींवर कॉंग्रेस नेत्यांनी विशेषत: गांधी घराण्याने केलेल्या टीकेमुळे उलट मोदी यांचाच राजकीय फायदा झाला आहे. कारण मोदींवर केलेली टीका देशातील जनता खपवून घेत नाही. मोदींनी आपल्या पंतप्रधानपदाच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात काय केले, देशाला कसे विकासाच्या मार्गावर नेले, जगात भारताची प्रतिष्ठा कशी उंचावली, हे कॉंग्रेसच्या नेत्यांना दिसत नसले तरी देशातील लोकांना दिसत आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनी जसे आपले डोळे बंद केले, तसे देशातील जनतेने आपले डोळे बंद केलेले नाहीत.

आपल्या 60 वर्षांच्या शासनकाळात कॉंग्रेसने विशेषत: नेहरू-गांधी घराण्याने देशाचा कसा बट्ट्याबोळ केला, हे कोणी सांगण्याची गरज नाही, देशातील जनतेला ते दिसते आहे. त्यामुळे गांधी घराण्यातील नेते वा अन्य कॉंग्रेस नेते जेव्हा मोदींवर टीका करतात, तेव्हा लोकांचे मनोरंजन होते, कॉंग्रेसच्या नेत्यांचा मूर्खपणा पाहून त्यांची कीव कराविशी वाटते. त्यामुळे आतातरी कॉंग्रेसच्या नेत्यांनी मोदी यांच्यावर टीका करू नये. टीका करायचीच असेल तर पुरेसा अभ्यास करून तर्कशुद्ध टीका करावी. जेणेकरून देशातील लोकांना ती खरी वाटेल. भाजपाच्या नेत्यांनी कॉंग्रेसचे आतापर्यंत तेवढे नुकसान केले नाही, त्याच्यापेक्षा जास्त नुकसान कॉंग्रेसच्या नेत्यांनी आपल्या हाताने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *