महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० एप्रिल । शनिवारी भर दुपारी भिवंडीतील वलपाडा येथील तीन मजली वर्धमान इमारत कोसळली. या भीषण दुर्घटनेमध्ये तीन जण ठार झाले असून 14 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. अद्यापही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत असून बचावकार्य सुरू आहे. अशातच एक तरुण तब्बल 20 तासानंतर ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर आला आहे.
इमारत कोसळल्यापासून ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले होते. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ आणि टीडीआरएफचे पथक युद्धपातळीवर बचावकार्य करत आहे. रविवारी सकाळी आठ वाजता एका तरुणाला जिवंत बाहेर काढण्यात यश आले. सुनिल बाळू पिसाळ (वय – 38) असे तरुणाचे नाव असून त्याला तात्काळ भिवंडीच्या आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Maharashtra | Rescue operations underway since last 19 hours after a 3-storey building collapsed in Bhiwandi, Thane. Teams of Fire Brigade, Police, TDRF & NDRF are present on spot to rescue people trapped in debris. More than 7 people are likely to be trapped, 14 people have been… pic.twitter.com/Si0ydrd5kb
— ANI (@ANI) April 30, 2023
सुनिल तब्बल 20 तास ढिगाऱ्याखाली होता. जवानांनी सुखरूप बाहेर काढताच त्याला रडू कोसळला. रडत रडतच त्याने हाथ जोडले आणि जवानांचे आभार मानले. जवानांनीही त्याला धीर दिला आणि नंतर ऑक्सिजन लावून स्ट्रेचरवरून रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. विशेष म्हणजे आज त्याचा वाढदिवस असल्याचीही माहिती मिळतेय.
अडीच वर्षांचा शिवकुमार आईसह ढिगाऱ्याखालून जिवंत परतला
तिसऱ्या मजल्याच्या ढिगाऱ्यात सोनाली आणि त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा शिवकुमार दबला. परंतु सोनाली यांनी उजेड दिसेल त्या बाजूने ढिगारा बाजूला सारत रस्ता बनवला आणि त्यातून इंच इंच सरकायला सुरुवात केली. अखेर दोघेही मायलेक मृत्यूच्या दाढेतून परतले.
तिघांचा मृत्यू
दरम्यान, या भीषण दुर्घटनेमध्ये एका चिमुकलीसह तिघांचा मृत्यू झाला. नवनाथ सावंत (वय – 35), ललिता रवी मोहतो (वय – 29) आणि सोना मुकेश कोरी (वय़ – 5) अशी मृतांची नावे आहेत.