महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० एप्रिल । स्वयंपाकाला पर्याय म्हणून किंवा गरज म्हणून बऱ्याचदा हॉटेलमधील खाद्यपदार्थ ऑनलाईन अॅप्लिकेशनच्या माध्यमातून मागवले जातात. जर तुम्ही देखील हॉटेलमधील खाद्यपदार्थ अॅप्लिकेशनच्या माध्यमातून मागवता, तर आता त्यासाठी तुम्हाला अधिकचं शुल्क मोजावं लागणार आहे.
फूड डिलिव्हरी अॅप्लिकेशन स्विगीने आता आपले दर वाढवले आहेत. स्विगीने आता प्रत्येक ऑर्डरवर दोन रुपयांचं प्लॅटफॉर्म शुल्क आकारायला सुरुवात केली आहे. अर्थात फक्त खाद्यपदार्थ मागवण्यावरच हा अधिकचा दर द्यावा लागेल. स्विगीच्या व्हर्टिकल किंवा इन्स्टामार्ट या सेवेसाठी हे दर लागू होणार नाहीत.
तसेच, हे दर बेंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई या शहरांसाठी लागू असणार आहेत. त्याखेरीज हे शुल्क स्विगी वन ही सेवा वापरणाऱ्यांवरही लागू करण्यात येणार आहे. हे शुल्क स्विगी अॅप्लिकेशनची यंत्रणा अधिक चांगली करण्यासाठी वापरलं जाणार आहे. जेणेकरून ग्राहकांना अधिक चांगली सेवा देता यावी, असं स्विगीचं म्हणणं आहे. स्विगी लवकरच शेअर बाजारात प्रवेश करणार असल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचं बोललं जात आहे.